Sanjay Manjrekar On Rohit And Hardik: रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार राहिला नाहीये. मुंबईने हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता रोहित कोणत्याही दबावाशिवाय मोकळेपणाने फलंदाजी करताना दिसेल. मुंबईने गुजरात टायटन्स संघाशी ट्रेड करत पंड्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. त्यामुळे पंड्या आता पुन्हा मुंबईचा भाग बनला आहे. अशात भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकरांचे रोहित आणि हार्दिकविषयी भाष्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चला तर, ते काय म्हणालेत जाणून घेऊयात…
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) याला एका चांगल्या फलंदाजाच्या रूपात पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहेत. आयपीएल 17 (IPL 17) हंगामाच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने उचललेल्या या पावलाविषयी मांजरेकर स्पष्ट बोलले आहेत. ते म्हणाले की, कोणीही या निर्णयाचा विचार भावनिकरीत्या केला नाही पाहिजे. त्यांचे म्हणणे होते की, रोहित दीर्घ काळापासून संघात आहे आणि ही बदलाची योग्य वेळ आहे.
मांजरेकरांचे विधान
रोहित आणि हार्दिकविषयी बोलताना मांजरेकर म्हणाले, “आपण रोहित शर्मा याच्याविषयी भावनात्मकरीत्या विचार केला नाही पाहिजे. हे मुंबई इंडियन्सने टाकलेले एक चांगले पाऊल आहे. कारण, हार्दिक पंड्याने स्वत:ला नेतृत्वकर्ता म्हणून सिद्ध केले आहे. तसेच, त्याने खेळाडू म्हणूनही सिद्ध केले आहे. तो तुमचा फॉर्ममधील टी20 कर्णधार आणि खेळाडू आहे. तसेच, रोहित शर्मा दीर्घ काळापासून संघात आहे.”
Sanjay Manjrekar said "Rohit Sharma will be the same batter, excited to see him as pure batter, I just hope Hardik doesn't feel the pressure – he is a proven leader, it makes lots of cricket sense to bring in Hardik Pandya". [Star Sports] pic.twitter.com/cyB1GtuUh9
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2023
पुढे बोलताना मांजरेकर म्हणाले की, “हार्दिक पंड्याला संघात घेणे क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मी फक्त एवढीच आशा करतो की, ज्याप्रकारे हे घडले आहे, त्यामुळे पंड्याने स्वत:वर दबाव आल्याचे वाटून घेऊ नये. तसेच, रोहित शर्मा फलंदाज असेल. जर तो नेतृत्व न करता शुद्ध फलंदाज बनून राहिला, तर मला नेतृत्वातील बदलाची कोणतीही समस्या नाहीये.”
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. सुरुवातीला विस्फोटक फलंदाजी करत रोहितने भारताला वेगवान सुरुवात करून दिली आहे. रोहितच्या फलंदाजीमुळे वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत सर्व सामन्यात भारताचा दबदबा पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना रोहितने भारताला दमदार सुरुवात करून दिली होती, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्या दिवशी उच्च कोटीची गोलंदाजी केली.
दुसरीकडे, हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघात दोन वर्षे घालवल्यानंतर पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. त्याने संघाच्या पहिल्याच हंगामात संघाला चॅम्पियन बनवले होते. तसेच, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातही तो संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात यशस्वी ठरला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून अखेरच्या चेंडूवर गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता.
अशात आता आयपीएल 2024 हंगामात हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ कशाप्रकारे प्रदर्शन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2024 auction former cricketer sanjay manjrekar rohit sharma pure batter mumbai indians hardik pandya)
हेही वाचा-
सुदर्शनच्या फलंदाजीची भारतीय दिग्गजालाही भुरळ; थेट भविष्यवाणी करत म्हणाला, ‘तो भारतासाठी 10-15 वर्षे…’
‘माझ्या मते तो कर्णधार बनण्याच्या…’, हार्दिक पंड्याविषयी माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान