आयपीएल २०२४ च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान होतं. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्जनं पंजाबवर २८ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं २० षटकांत ९ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, १६८ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली पंजाबची टीम २० षटकांत ९ गडी गमावून १३९ धावाच करू शकली.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा चालू हंगामाच्या 11 सामन्यांतील हा सहावा विजय आहे. या विजयासह संघानं गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा 11 सामन्यांतील हा ७वा पराभव ठरला. संघ गुणतालिकेत ८व्या स्थानी आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा. जडेजानं प्रथम फलंदाजी करताना 43 धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजीत तीन बळी घेतले. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरननं ३० धावा आणि शशांक सिंहनं २७ धावा केल्या. चेन्नईकडून जडेजा व्यतिरिक्त सिमरजीत सिंग आणि तुषार देशपांडे यांनीही शानदार गोलंदाजी केली. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जनं 9 गडी गमावून 167 धावा केल्या. सीएसकेकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक ४३ धावा केल्या. जडेजानं २६ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 32 आणि डॅरिल मिशेलनं 30 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
आजच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला खातंही उघडता आलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला हर्षल पटेलनं क्लीन बोल्ड केलं. पंजाबकडून हर्षल पटेल आणि राहुल चहरनं प्रत्येकी तीन बळी घेतले. तर अर्शदीप सिंगनं दोन विकट घेतल्या.
दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन, विद्वथ कवेरप्पा, ऋषी धवन
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसकेच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘बेबी मलिंगा’ जखमी होऊन आयपीएलमधून बाहेर
ऋतुराज गायकवाडचं नशीबच फुटकं! ११ पैकी १० सामन्यांमध्ये हरला टॉस; लवकरच करणार लाजिरवाणा विक्रम