चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्च रोजी आयपीएल 2024 चा सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकिटांचं बुकिंग आता सुरू झालं आहे. सोमवार (18 मार्च) सकाळपासून तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू झाली. तिकिटांची विक्री सुरू होताच चाहते त्यावर तुटून पडले. मात्र मर्यादित तिकीटं उपलब्ध असल्यानं हजारो चाहत्यांची निराशा झाली.
चेन्नई आणि बंगळुरूच्या सामन्याच्या तिकिटांची किंमत 1700 रुपयांपासून पासून सुरू होते. बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच वेबसाइट क्रॅश झाली. पेटीएम इनसाइडरवर सामन्याची तिकिटं विकली जात आहेत. या साईटवर हजारोंच्या संख्येनं चाहते पोहचल्यानं वेबसाइटचं काम थांबलं. पेटीएमनं सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. कंपनीनं सांगितलं की, वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचण आहे. ती लवकरच दूर केली जाईल.
आरसीबी आणि सीएसके सामन्याची तिकिटं विविध श्रेणींत मिळत आहेत. 1700 रुपयांपासून तर 7500 रुपयांपर्यंतची तिकिटं उपलब्ध आहेत. मात्र हजारो चाहत्यांना तिकीट मिळू शकलेलं नाही. तिकीट न मिळाल्याबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. अनेक चाहते कमालीचे निराशही झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल. रेकॉर्डवर नजर टाकली तर या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 31 सामने खेळले गेले. यापैकी चेन्नईनं 20 तर बंगळुरूनं 10 सामने जिंकले आहेत.
आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व करताना दिसेल. तर बंगळुरूची कमान दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं पाच वेळा (2010, 2011, 2018, 2021, 2023) आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय. तर आरसीबीला अजूनही आपल्या पहिल्या ट्रॉफीची प्रतिक्षा आहे. उल्लेखनीय म्हणजे, आरसीबीचा संघ तीन वेळा (2009, 2011, 2016) आयपीएलचा उपविजेता राहिला आहे. नुकत्याच झालेल्या महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये आरसीबीच्या संघानं आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं.
महत्त्वाच्या बातम्या-
ट्रॉफी जिंकल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत दिसली स्मृती मानधना? व्हायरल फोटोमधील ‘हा’ व्यक्ती कोण?
सीएसकेनं इलेक्टोरल बाँडद्वारे ‘या’ पक्षाला दिला 5 कोटी रुपयांचा निधी, अहवालात धक्कादायक माहिती उघड!
IPL 2024 पूर्वी फार्मात आला गुजरात टायटन्सचा गोलंदाज, इतर संघांसाठी धोक्याची घंटा!