आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजयाची नोंद केली. ऋतुराजला काही दिवसांपूर्वीच चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. आता कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. सामन्यानंतर बोलताना ऋतुराजनं आपला अनुभव सांगितला. “माझ्यासोबत ‘माही भाई’ आहे. त्यामुळे मला कोणतंही दडपण जाणवलं नाही”, असं तो म्हणाला.
“आमच्याकडे सामन्याचं पूर्ण नियंत्रण होतं. दोन-तीन षटकं आम्हाला महागात पडली, परंतु फिरकी गोलंदाज आणि मुस्तफिजूर आल्यानंतर आम्ही नियंत्रण मिळवलं. मला वाटलं की आम्ही 10-15 धावा कमी दिल्या असत्या तर बरं झाले असतं. ते शेवटी चांगले खेळले. मी माझ्या कर्णधारपदाचा खूप आनंद लुटला”, असं ऋतुराज म्हणाला.
“सामन्यादरम्यान माझ्यावर जास्त दडपण आहे असं मला वाटलं नाही. मी ज्या प्रकारे माझ्या राज्याचं नेतृत्व करतो, अगदी तसंच वाटलं. मला परिस्थिती समजून घेण्याचा आणि तिला मॅनेज करण्याचा अनुभव आहे. यामुळे मी याचा आनंद लुटला. माझ्यावर एकदाही दडपण आलं नाही. माझ्यासोबत ‘माही भाई’ आहे. माझ्यासाठी हा खूप मस्त क्षण होता”, असं ऋतुराजनं नमूद केलं.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघानं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 173 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेच्या जवळपास सर्वच खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. मात्र त्यापैकी एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकली नाही. अखेरीस शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईनं 6 विकेट्सनं विजय मिळवला.
आरसीबी विरुद्धच्या या विजयासह सीएसकेच्या खात्यात 2 गुणांची नोंद झाली. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना 26 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिककडून निवृत्तीचे संकेत, CSK vs RCB सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
फाफ डू प्लेसिसनं सांगितलं चेन्नईविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “पहिल्या डावात आम्ही…”