आयपीएल 2024 च्या 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. 12 मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं यजमान संघाला विजयासाठी 142 धावांचं छोटेखानी लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी 18.2 षटकांत गाठलं.
चालू हंगामाच्या 13 सामन्यांमधील सीएसकेचा हा सातवा विजय आहे. संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा 12 सामन्यांमधील हा चौथा पराभव ठरला.
चेन्नई सुपर किंग्जसाठी कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 41 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी खेळली. आपल्या या खेळीत त्यानं 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराजनं शेवटपर्यंत ठाण मांडून संघाला विजयापर्यंत पोहचवलं. सलामीवीर रचिन रवींद्रनंही 18 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीनं 27 धावा केल्या. राजस्थानसाठी आर. अश्विननं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नांद्रे बर्जर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 5 गडी गमावून 141 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागनं 35 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी खेळली. रियाननं आपल्या या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला. ध्रुव जुरेलनंही 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 28 धावांची खेळी केली. सीएसकेकडून सिमरजीत सिंगनं सर्वाधिक तीन बळी घेतले. तर तुषार देशपांडनं दोन बळी मिळवले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थेक्षाना
इम्पॅक्ट प्लेअर्स – अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, प्रशांत सोळंकी, अजय मंडल, मुकेश चौधरी
महत्त्वाच्या बातम्या –
संजू सॅमसनच्या नावे आणखी एक विक्रम, आयपीएलमध्ये मोडला स्वत:चा रेकॉर्ड
महेंद्रसिंह धोनी आज करणार निवृत्तीची घोषणा? सीएसकेच्या सोशल मीडिया पोस्टनं खळबळ!