ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स या हंगामातील आपल्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मैदानात उतरली आहे. या सामन्यात ऋषभ पंतनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यातील मोठी बातमी म्हणजे, दिल्ली संघानं या सामन्यात काही बदल केले ज्याची माहिती कर्णधार पंतनं दिली. दिल्लीनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी दिली, तर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही.
दिल्लीनं पृथ्वी शॉला आयपीएल 2024 च्या पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती, मात्र रिकी भुईची टॉप ऑर्डरमधील खराब कामगिरी पाहता त्याला प्लेइंग इलेव्हन मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पृथ्वीनंही त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि दिल्लीला ताबडतोब सुरुवात करून दिली.
पृथ्वी शॉ या सामन्यात आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. त्यानं 27 चेंडूचा सामना करत 43 धावांची खेळी केली. या दरम्यान त्यान 4 चौकार आणि 2 शानदार षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट 159.26 एवढा राहिला. मात्र शॉ त्याला मिळालेल्या सुरुवातीचं रुपांतर मोठ्या खेळीत करू शकला नाही. रवींद्र जडेजानं त्याला धोनीच्या हाती झेलबाद केलं.
शॉनं आयपीएलमधील शेवटचा सामना चेन्नईविरुद्धच खेळला होता. गेल्या हंगामात तो चेन्नईविरुद्धच्या सामन्यात केवळ 5 धावा करून बाद झाला होता. पृथ्वी शॉनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 71 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 1,694 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून 13 अर्धशतकी खेळीही निघाल्या आहेत.
गेल्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून एकही सामना खेळला नव्हता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याचा फॉर्मही चिंतेचा विषय होता. काही आठवड्यांपूर्वीच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला होता. सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंगनंही पृथ्वी शॉच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते.
पृथ्वी शॉची फलंदाजीची शैली विरेंद्र सेहवाग सारखी अतिशय आक्रमक असून उंचीच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकरसारखा आहे. या कारणास्तव त्याची तुलना दोन्ही महान फलंदाजांशी केली जाते. गेल्या मोसमात त्यानं 8 सामने खेळताना केवळ 106 धावा केल्या होत्या. मात्र यावेळी त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेजर-मॅकगर्क
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरातनं उडवला हैदराबादचा धुव्वा! 7 गडी राखून शानदार विजय
5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात
सनरायझर्स हैदराबाद अडचणीत! मुख्य फिरकी गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर