रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं सलग दुसरा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केलं आहे. आयपीएल 2024 च्या 43व्या सामन्यात शनिवारी (27 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी पराभव केला.
हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 258 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 9 गडी गमावून केवळ 247 धावा करू शकला. मुंबईकडून तिलक वर्मानं 32 चेंडूत सर्वाधिक 63 धावांची खेळी खेळली. तर कर्णधार हार्दिक पांड्यानं 24 चेंडूत 46 आणि टीम डेव्हिडनं 17 चेंडूत 37 धावा केल्या. मात्र यापैकी कोणीही आपल्या संघाला विजयापर्यंत पोहचवू शकलं नाही. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार आणि रसिक सलाम यांनी 3-3 बळी घेतले. तर खलील अहमदला २ बळी मिळाले.
या विजयासह दिल्ली कॅपिटल्सनं प्लेऑफच्या शर्यतीत आपला दावा मजबूत केला आहे. संघानं आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसह गुणतालिकेत 5व्या स्थानावर आले आहेत. दुसरीकडे मुंबईचा संघ 9व्या क्रमांकावर आहे. त्यांनी 9 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. आता त्याच्यासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. आता मुंबईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी उर्वरित सर्व 5 सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीनं 4 गडी गमावून 257 धावा केल्या. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कनं 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र, तो आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडू शकला नाही. तो 27 चेंडूत 84 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्यानं 6 षटकार आणि 11 चौकार लगावले.
मॅकगर्कशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं 25 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी खेळली. तर शाई होपनं 17 चेंडूत 41 धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतनं 29 धावा केल्या. मुंबईकडून ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. याआधी 7 एप्रिलला मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना झाला होता. जिथे वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सनं दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला होता. आता दिल्लीनं हा सामना जिंकून त्या पराभवाचा वचपा काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् रिषभ पंत भर मैदानात उडवायला लागला पतंग! पाहा व्हायरल व्हिडिओ
प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याच्या इराद्यानं उतरणार राजस्थान, लखनऊविरुद्ध टॉस जिंकून गोलंदाजी
“तुमचं रडगाणं थांबवा….”, प्रत्येक सामन्यात मार खाणाऱ्या गोलंदाजांना असं काय म्हणाले रवी शास्त्री?