आयपीएल 2024 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. हा सामना रविवारी (31 मार्च) विशाखापट्टनम येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्लीनं चेन्नईवर 20 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नई निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 171 धावाच करू शकली.
या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2024 मध्ये पहिल्यांदा फलंदाजीला उतरला. माहीनं 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 37 धावा ठोकल्या. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं 35 चेंडूत सर्वाधिक 52 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतनं 32 चेंडूत 51 धावांचं योगदान दिलं. पृथ्वी शॉ 27 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. मार्श 18 आणि स्टब्स खातं न उघडता बाद झाले. अक्षर पटेल 7 धावा करून नाबाद तर अभिषेक 9 धावा करून नाबाद माघारी परतला.
चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत 31 धावा देत 3 बळी घेतले. तर मुस्तफिजूर रहमान आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला.
याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड केवळ 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रचिन रवींद्रच्या बॅटमधूनही धावा निघाल्या नाहीत. त्यानं 12 चेंडूत 2 धावा केल्या. डॅरिल मिशेलनं 26 चेंडूत 34 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेनं मात्र शानदार फटकेबाजी केली. तो 30 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. वॉर्नरनं मुकेश कुमारच्या गोलंदाजीत त्याचा झेल घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्किया, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेजर-मॅकगर्क
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर
महत्त्वाच्या बातम्या-
जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक
अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO
राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला