---Advertisement---

जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक

---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2024 चा 13 वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची बॅट जोरदार चालली. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर प्रथमच क्रिकेट स्पर्धा खेळत असलेल्या पंतनं या सामन्यात शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 160 चा राहिला. ऋषभ पंतनं अर्धशतक पूर्ण करताच विशाखापट्टणमच्या स्टेडिममध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं उभं राहून कौतुक केलं.

पंतनं चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात केवळ 32 चेंडूंचा सामना करत 51 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्यानं 4 चौकार आणि 3 षटकार मारले. विशेष म्हणजे, पंतनं या डावातील पहिल्या 23 चेंडूत केवळ 23 धावा केल्या होत्या. यानंतर त्यानं धुवांधार फलंदाजी करत पुढच्या 9 चेंडूत 28 धावा ठोकल्या आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अपघातानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना ऋषभ पंतचं हे पहिलं अर्धशतक आहे. विशेष म्हणजे, चाहतेही त्याच्या या खेळीची आतुरतेनं वाट पाहत होते.

ऋषभ पंतनं 50 धावा पूर्ण करताच स्टेडियममध्ये बसलेला प्रत्येक जण उभे राहून कौतुक करताना दिसला. केवळ चाहतेच नाही तर डगआऊटमध्ये बसलेले सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. याआधी ऋषभ पंतनं आयपीएल 2024 मध्ये दोन सामने खेळले होते, परंतु चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही त्याला आपल्या डावाचं मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही.

विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात ऋषभ पंतच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित 20 षटकात 191 धावा केल्या. संघाचे सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शानदार सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 93 धावा जोडल्या. वॉर्नर 52 धावा करून मुस्तफिजुर रहमानचा बळी ठरला. यानंतर पृथ्वी शॉच्या रूपानं संघाला दुसरा धक्का बसला. तो 43 धावा करून बाद झाला. या मोसमात पृथ्वीचा हा पहिलाच सामना होता. यानंतर पंतनं शानदार फलंदाजी करत 51 धावा केल्या. मिचेल मार्शनं 18 धावा केल्या. दिल्लीच्या बाकीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात यश आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉ इज बॅक! चेन्नईविरुद्ध संधी मिळताच दाखवली आपली ताकद

राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला

अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---