आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान होतं. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. केकेआरनं हैदराबादवर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची टीम 18.3 षटकांत 113 धावांवर ऑलआऊट झाली होती. केकेआरनं हे लक्ष्य 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं.
फायनलमध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाला केकेआर कडून 8 विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 114 धावांचे सोपे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआर संघाने 2 गडी गमावून अवघ्या 10.3 षटकांत सामना आणि विजेतेपद पटकावले. संघाकडून व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. तर रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी 1-1 बळी घेतला.
केकेआरने यापूर्वी 2012 आणि 2014 आयपीएल हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन्ही वेळा विजेतेपद पटकावले होते. यानंतर, 2021 च्या हंगामात, ते ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत पोहोचले, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झाले. केकेआर संघाचा हा चौथा अंतिम सामना होता आणि त्यांनी तिसरे विजेतेपद पटकावले आहे.
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद यांनी आतापर्यंत फक्त एकदाच विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 2016 चा हंगाम जिंकला होता. 2009 मध्ये देखील हैदराबाद संघाने विजेतेपद पटकावले होते, परंतु तेव्हा त्याचे नाव डेक्कन चार्जर्स होते आणि फ्रेंचायझीचे मालक (गायत्री रेड्डी) होते.
या सामन्यात हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि ते 18.3 षटकात 113 धावांवर सर्वबाद झाले. यासोबतच हैदराबाद संघानं एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
हैदराबादचा संघ आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही अंतिम सामन्यात सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला आहे. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) विक्रम मोडला आहे. याआधी चेन्नई संघानं 2013 च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 विकेट्सवर 125 धावा केल्या होत्या. हा सामना ईडन गार्डन्सवर झाला होता.
या अंतिम सामन्यात केकेआर संघाचे गोलंदाज पूर्णपणे वरचढ दिसत होते. त्यांच्यासमोर हैदराबादचे फलंदाज फारसे चालले नाहीत. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स सर्वाधिक 24 धावा करू शकला आणि एडन मार्करमला 20 धावा करता आल्या.
त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. हेनरिक क्लासेननं 16 धावा केल्या. कोलकाताकडून वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलने 3 बळी घेतले. तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर
कोलकाता नाईट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफाईन रदरफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
संपूर्ण आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम!
अरे.. ही कोणती पद्धत ! आयपीएल फायनलमध्ये कर्णधार श्रेयस अय्यरनं आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली नाणेफेक