भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. बीसीसीआयनं लीगच्या पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बोर्ड लवकरच प्लेऑफ आणि फायनलसह लीग टप्प्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करेल.
दरम्यान, एक अहवाल समोर आला असून त्यात प्लेऑफचं ठिकाण उघड झालं आहे. अहवालानुसार, यावेळी आयपीएल 2024 चा अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयोजित केला जाऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला जात आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळला जाऊ शकतो.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं की, “आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं गतवर्षीच्या विजेत्या (चेन्नई सुपर किंग्ज) च्या घरच्या मैदानावर प्लेऑफचा पहिला सामना आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा पाळली आहे.”
जर चेन्नईला अंतिम सामन्याचं यजमानपद मिळालं आणि सीएसके जेतेपदाच्या सामन्यात पोहोचण्यात यशस्वी ठरली, तर धोनीच्या चाहत्यांसाठी तो खूप भावनिक क्षण असेल. कारण, यंदाचा आयपीएल हंगाम हा माहीचा शेवटचा असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2024 च्या फायनलच्या रुपात चेन्नईच्या चाहत्यांसमोर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणं धोनीसाठी सर्वात मोठा क्षण ठरू शकतो.
तथापि, आयपीएल 2024 चा अंतिम सामना चेन्नईमध्येच खेळवला जाईल, यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. त्याचवेळी, सीएसकेला सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचण्यासाठी अजून बरंच अंतर पार करायचं आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन बीसीसीआयनं आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक निश्चित केलं असून ते लवकरच जाहीर केलं जाणार आहे. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, चेन्नईला आयपीएल 2024 च्या फायनलचं आणि प्लेऑफच्या पहिल्या सामन्याचं म्हणजेच क्वालिफायर-1 चं यजमानपद मिळू शकतं. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 चे सामने खेळले जाऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
लिलावात विकल्या न गेलेल्या खेळाडूनं पदार्पणातच ठोकलं अर्धशतक! हैदराबादच्या गोलंदाजांची नाचक्की
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी