आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात झाल्यापासून हार्दिक पांड्या सतत चर्चेत आहे. आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी त्यानं गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतण्याचा निर्णय घेतला. तेथे रोहितला हटवून त्याला कर्णधार बनवण्यात आलं. मात्र कर्णधारपदासोबतच एक खेळाडू म्हणून हार्दिकची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला आतापर्यंत 8 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर हार्दिकनं बॅटनं केवळ 151 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्यानं 4 विकेट्स घेतल्या आहेत. या बातमीत आम्ही तुम्हाला हार्दिक पांड्यानं मुंबईचं नेतृत्व करताना केलेल्या चार मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहोत.
राशिद खान विरुद्ध आपल्या आधी टीम डेव्हिडला फलंदाजीला पाठवणं
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं विजयासाठी 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी चांगली फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीत आणलं. मात्र, दोघेही बाद झाल्यानंतर अखेरच्या चार षटकांत मुंबईला विजयासाठी 39 धावांची गरज होती.
फिरकीपटूंविरुद्ध टीम डेव्हिडचा खराब रेकॉर्ड जाणूनही हार्दिकनं त्याला त्याच्या पुढे फलंदाजीला पाठवलं. यामुळे 17व्या षटकात केवळ तीन धावा झाल्या आणि 18व्या षटकात डेव्हिड बाद झाला. अशाप्रकारे गुजरातनं दमदार पुनरागमन केलं आणि मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची आवश्यकता होती. हार्दिक तिसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर बाद झाला आणि मुंबईनं सामना 6 धावांनी गमावला.
जसप्रीत बुमराहला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध उशीरा गोलंदाजी देणे
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं गोलंदाजीत बदल करताना मोठी चूक केली. त्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत 277 धावा ठोकल्या होत्या.
या सामन्यात जसप्रीत बुमराहनं त्याच्या पहिल्या षटकात केवळ 5 धावा दिल्या. यानंतर हार्दिकनं अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडची आक्रमक फलंदाजी रोखण्यासाठी बुमराहला गोलंदाजीच दिली नाही. बुमराह 13व्या षटकात आपला दुसरा ओव्हर टाकण्यासाठी परतला. तोपर्यंत हैदराबादची धावसंख्या 173/2 होती.
278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याचा खराब स्ट्राईक रेट
सनरायझर्स हैदराबादनं दिलेल्या 278 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या आघाडीच्या 4 फलंदाजांनी उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं धावा केल्या. परंतु हार्दिक पांड्याला ती लय राखण्यात यश आलं नाही. तो डॉट बॉल्स खेळत राहिला, ज्यामुळे संघाची सामना जिंकण्याची शक्यता कमी झाली. पांड्यानं 20 चेंडूत केवळ 24 धावा केल्या.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात नेहाल वढेराला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं नाही
नेहाल वढेराला पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचा ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणूनही उपयोग झाला नाही. वढेरानं राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या आठव्या सामन्यात हंगामातील आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात त्यानं 24 चेंडूत 49 धावांची शानदार खेळी खेळली. वढेरानं गेल्या मोसमातही चांगली छाप पाडली होती. मात्र या मोसमात त्याला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बेंचवर बसावं लागलं.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2024 मध्ये कांगारू फलंदाज तुफान फार्मात! टी20 विश्वचषकासाठी सर्व संघांना धोक्याची घंटा!
इरफान पठाणनं निवडला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ; हार्दिक पांड्याला स्थान, मात्र एका अटीवर…
रवींद्र जडेजाला बॅटिंग ऑर्डरमध्ये बढती देणं चेन्नईलाच पडतंय महागात? कसं ते समजून घ्या