रविवारी (24 मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 5 वा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याकडे होत्या. वास्तविक, यावर्षी मुंबईनं हिटमॅनकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. या दोन खेळाडूंमधील केमिस्ट्री सामन्यादरम्यान कशी आहे हे चाहत्यांना पाहायचं होतं. सामन्यादरम्यान अनेकवेळा रोहित हार्दिकला सल्ले देताना दिसला, तर क्षेत्ररक्षणासाठी पांड्या रोहितला सीमारेषेभोवती पळवताना दिसला. रोहित सहसा 30 यार्डच्या वर्तुळात फिल्डिंग करतो, परंतु हार्दिकनं त्याला सीमारेषेवर उभं केलं होतं.
मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकता आला नाही. मात्र सामन्यानंतर रोहित शर्मा हार्दिक पांड्याला फटकारताना दिसला. गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या मागून येतो आणि रोहित शर्माला मिठी मारतो. त्यानंतर रोहित त्याला काहीतरी रागात बोलायला लागतो. यावेळी टीम मालक आकाश अंबानी यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 168 धावा केल्या. गुजरातच्या एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आलं नाही. परंतु साई सुदर्शननं 45 आणि शुभमन गिलनं 31 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 4 षटकांच्या कोट्यात 14 धावा देऊन 3 बळी घेतले.
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन पहिल्याच षटकात खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर रोहित शर्मा (43) नमन धीर (20) आणि डेवाल्ड ब्रेव्हिस (46) यांनी संघाला 100 च्या पुढे नेलं. 16व्या षटकात जेव्हा ब्रेव्हिस बाद झाला तेव्हा मुंबईला विजयासाठी 25 चेंडूत 40 धावा हव्या होत्या. सामना मुंबई इंडियन्सच्या हातात होता. पण त्यानंतर गुजरात टायटन्सनं जोरदार पुनरागमन केलं आणि मुंबईचा 6 धावांनी पराभव झाला. हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हिड संघाला विजयापर्यंत नेऊ शकले. अशाप्रकारे मुंबईचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात पराभव झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईच्या पराभवानंतर गुणतालिकेची स्थिती काय? जाणून घ्या ताजे अपडेट्स