IPLक्रिकेटटॉप बातम्या

30 चेंडूत हव्या होत्या 43 धावा, तरीही मुंबई कशी पराभूत झाली? जाणून घ्या शेवटच्या पाच षटकांचा संपूर्ण थरार

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अपेक्षेप्रमाणेच अत्यंत रोमांचक ठरला. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 168 धावा केल्या. मुंबई इंडियन्सची टीम हे लक्ष्य आरामात गाठेल असं वाटत होतं. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 3 बाद 126 धावा होती आणि त्यांना विजयासाठी 5 षटकात 43 धावांची आवश्यकता होती. मात्र इथून सामना पलटला. गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यात जोरदार कमबॅक केलं आणि मुंबईच्या फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवलं. शेवटच्या 5 षटकांमध्ये गुजरातच्या गोलंदाजांनी गमावलेला सामना आपल्याकडे खेचून आणला.

मोहित शर्मा 16 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्यानं फक्त 4 धावा दिल्या. हे षटक सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरलं. कारण या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहितनं डेवाल्ड ब्रेव्हिसला झेलबाद केलं. तो 46 धावा करून क्रीजवर होता. त्याचं बाद होणं हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का होता.

राशिद खाननं टाकलेल्या 17 व्या षटकातही केवळ 3 धावा गेल्या. तोपर्यंत मुंबई बॅकफूटवर आली होती. राशिदच्या षटकात फक्त 3 एकेरी धावा आल्या. येथून मुंबईला शेवटच्या 3 षटकात 36 धावांची गरज होती.

18वं षटक टाकण्यासाठी पुन्हा मोहित शर्मा आला. मोहितनं ओव्हरच्या पहिल्या 4 चेंडूत 9 धावा दिल्या. मुंबई सामन्यात पुनरागमन करत आहे असं वाटत होतं, पण नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड मिलरच्या हाती झेल देऊन बाद झाला.

19 वं आणि महत्त्वाचं षटक स्पेन्सर जॉन्सननं टाकलं. त्याला याआधी सामन्यात जोरदार पिटाई झाली होती. तिलक वर्मानं त्याला पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला, मात्र पुढच्याच चेंडूवर तिलकनं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. जॉन्सनच्या षटकात 8 धावा आल्या आणि शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती.

20व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्यासमोर उमेश यादव गोलंदाजीला आला. हार्दिकनं पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून मुंबईच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत केल्या. परंतु तिसऱ्या चेंडूवर शॉट मारताना टायमिंग चुकल्यानं हार्दिक लाँग-ऑनवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही पॅव्हेलियनमध्ये परतला. उमेश यादवला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही, मात्र त्यानं गुजरातला 6 धावांनी विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिक पांड्याची घरच्या मैदानावरच नाचक्की; संपूर्ण सामन्यादरम्यान जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा

रोमहर्षक सामन्यात गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्सवर अवघ्या 6 धावांनी विजय

यू… यू…! कुत्र्याने तोडली नरेंद्र मोदी स्टेडियमची सिक्युरिटी, लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याची चेष्टा

Related Articles