दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावणं गुजरात टायटन्सला चांगलंच महागात पडलं. संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ 89 धावाच करू शकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवलं. गुजरातनं अवघ्या 50 धावांतच 6 विकेट गमावल्या होत्या.
तसं पाहिलं तर, गुजरात टायटन्सची टीम आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत होती. परंतु संघाचे फलंदाज एक-एक धाव काढण्यासाठी धडपडताना दिसले. इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांच्या स्पेलनं गुजरातच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. गुजरातसाठी सर्वाधिक धावा राशिद खाननं (24 चेंडूत 31 धावा) केल्या. ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाज आहे. मात्र त्यानंही एकाच षटकात 2 बळी घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
गुजरात टायटन्सच्या डावात 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शननं 12 आणि राहुल तेवतियानं 10 धावांचं योगदान दिलं. 15 व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सची धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा होती. मात्र राशिद खान अखेरच्या षटकांमध्ये भक्कम भिंतीसारखा क्रीजवर उभा राहिला. गुजरातच्या डावात षटकार ठोकणारा राशिद एकमेव फलंदाज होता. संथ खेळपट्टीवर खेळत असताना, गुजरात टायटन्सचा डाव 18व्या षटकातच संपुष्टात आला.
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची भरपूर पिटाई झाली आहे. परंतु गुजरात विरुद्धच्या सामन्यात संघाचा प्रत्येकच गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. मुकेश कुमारनं 3, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सनं 2, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
कुलदीप यादवला एकही बळी घेता आला नसला तरी त्यानं 4 षटकांत केवळ 16 धावा देऊन गुजरातच्या फलंदाजांना सतत दबावाखाली ठेवलं. या तगड्या गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीनं गुजरातला पूर्ण 20 षटकंही खेळू दिली नाहीत. आजच्या सामन्यात खलील अहमदनं मेडन षटक टाकलं. त्यानं आतापर्यंत या हंगामात 2 मेडन षटकं टाकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
या लहान मुलीची बॉलिंग ॲक्शन पाहून सचिनला आठवण आली दिग्गज गोलंदाजाची; म्हणाला, “तुझं करिअर…”
‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…
मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”