आयपीएल 2024 च्या 44व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थाननं लखनऊवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थाननं हे लक्ष्य 19 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली राहिली. यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सलामीला 60 धावा जोडल्या. जयस्वाल 17 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. तर बटलरनं 18 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. रियान पराग मोठी खेळी खेळू शकला नाही. तो 11 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसन आणि युवा ध्रुव जुरेल यांनी शानदार अर्धशतकं ठोकली. संजू सॅमसननं 33 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या. त्यानं 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. ध्रुव जुरेलनं त्याला चांगली साथ देत नाबाद 52 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सनं 20 षटकांत 5 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनं 31 चेंडूत अर्धशतक केलं. तो 48 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. राहुलनं आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार लगावले. दीपक हुडानं 31 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
एकवेळ लखनऊनं 11 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर राहुल आणि दीपक यांच्यात 62 चेंडूत 115 धावांची भागीदारी झाली. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्मानं सर्वाधिक 2 बळी घेतले. त्यानं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 31 धावा दिल्या. याशिवाय आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि अश्विन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रियान पराग, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अमित मिश्रा, अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौथम, युधवीर सिंग चरक, मणिमरण सिद्धार्थ
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? टॉप-4 मध्ये येण्यासाठी आता काय करावं लागेल? जाणून घ्या
दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, घरच्या मैदानावर दिला मुंबई इंडियन्सला धोबीपछाड
फक्त चौकार-षटकारांमध्ये डील करणारा जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? त्याचा आयपीएलचा पगार किती?