वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (11 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं अवघ्या 15.3 षटकांत विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांची एक चालू दिली नाही. आरसीबीच्या गोलंदाजांची खराब अवस्था पाहून स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी चक्क विराट कोहलीलाच गोलंदाजी करण्याची मागणी केली.
कोहलीला गोलंदाजीची मागणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘कोहलीला गोलंदाजी द्या…’ असा आवाज व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. स्टँडमध्ये उपस्थित असलेले चाहते विराट कोहलीनं गोलंदाजी करावी, अशी मागणी सातत्यानं करताना दिसतात. यावर खुद्द किंग कोहलीनं अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली.
आवाज ऐकून कोहलीनं चाहत्यांकडे पाहून हातवारे केले. यानंतर कोहली सीमारेषेजवळ आला आणि त्यानं पुन्हा हातवारे केले. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. कोहलीच्या चाहत्यांना त्याला फलंदाजीसोबत गोलंदाजी करतानाही पाहायचं आहे. विराट कोहली शेवटचा 2023 एकदिवसीय विश्वचषका दरम्यान गोलंदाजी करताना दिसला होता.
Crowd cheering “Kohli Ko Bowling Do”….!!!!
– The reaction from Kohli. 😄👌pic.twitter.com/6ibU5bCivr
— Johns. (@CricCrazyJohns) April 11, 2024
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. संघासाठी कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 40 चेंडूत सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली, त्याच्या या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रजत पाटीदारनं 26 चेंडूत 50 धावांचं योगदान दिलं. त्यानं 3 चौकार आणि 4 षटकार खेचले. अखेरच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकनं तुफानी फटकेबाजी केली. तो अवघ्या 23 चेंडूत 53 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईनं दमदार सुरुवात केली. इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 53 चेंडूत 101 धावांची भागिदारी रचली. इशान किशननं 34 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं सर्वाधिक 69 धावा केल्या. रोहितनं 24 चेंडूत 38 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक ठोकलं. तो 19 चेंडूत 52 धावा करून नाबाद राहिला. हार्दिक पांड्या 6 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं शानदार फलंदाजी करत 5 गडी बाद केले. त्यानं आपल्या 4 षटकांच्या कोट्यात अवघ्या 21 धावा दिल्या. बुमराहला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-