भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं रविवारी (31 मार्च) क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम रचला, ज्याला आतापर्यंत जगातील कोणताही यष्टीरक्षक गवसणी घालू शकलेला नाही. धोनीनं आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक विक्रम केला.
रविवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2024 13वा सामना खेळला गेला. या सामन्यात फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाच्या चेंडूवर धोनीनं पृथ्वी शॉचा यष्टीमागे झेल घेतला. अशाप्रकारे धोनी टी-20 क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा जगातील पहिला यष्टिरक्षक बनला आहे. या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि भारताचा दिनेश कार्तिक संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्याही नावे 274 बळी आहेत.
कार्तिक अजूनही आयपीएलमध्ये खेळतोय. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. अशा स्थितीत त्याच्याकडे कामरान अकमला मागे टाकण्याची संधी असेल. या दोघांनंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक (270) आणि इंग्लंडचा जोस बटलर (209) यांचा क्रमांक लागतो. हे दोघं देखील सध्या क्रिकेट खेळत आहेत.
टी-20 क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक बळी
300 – महेंद्रसिंह धोनी*
274 – कामरान अकमल
274 – दिनेश कार्तिक*
270 – क्विंटन डी कॉक*
209 – जोस बटलर*
42 वर्षीय महेंद्रसिंह धोनीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 332 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं (कसोटी + एकदिवसीय + टी20), जे कर्णधार म्हणून सर्वोच्च आहे. रिकी पाँटिंगनं 324 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलंय. या 332 सामन्यांपैकी धोनीनं 178 सामने जिंकले आणि 120 सामने गमावले. तर 6 सामने बरोबरीत आणि 15 अनिर्णित राहिले.
माहीनं 90 कसोटींमध्ये 4876 धावा, 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1617 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यानं आयपीएलच्या 253 सामन्यात 5119 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे कसोटीत 6 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 शतकं आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये मात्र तो अद्याप तिहेरी आकडा गाठू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, भाजपात प्रवेश करणार?
जबरदस्त ऋषभ! 4 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार…अपघातातून परतल्यानंतर ठोकलं पहिलं अर्धशतक