सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक मोठी घटना घडली.
सनरायझर्सचा सलामी फलंदाज ट्रॅव्हिस हेडला पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं. चेंडू त्याच्या बॅटला चाटून विकेटकीपरच्या हाती गेला होता. विकेटकीपर जितेश शर्मानं अपील केलं, मात्र पंचांनी आऊट दिलं नाही. गोलंदाज कागिसो रबाडा रिव्हूसाठी जास्त इच्छूक दिसत नव्हता. तरी देखील जितेश शर्मा अपील करतच होता. मात्र कर्णधार शिखर धवननं गोलंदाजाची बाजू घेत रिव्हू घेतला नाही. काही वेळानंतर मोठ्या स्क्रीनवर जेव्हा चेंडूचा रिप्ले दाखवण्यात आला, तेव्हा त्यामध्ये चेंडू बॅटला चाटून गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. जर पंजाब किंग्जनं रिव्हू घेतला असता, तर ट्रॅव्हिस हेड बाद झाला असता. मात्र शिखर धवननं रिव्हू घेतला नाही, ज्यामुळे हेडला जीवनदान मिळालं.
ट्रॅव्हिस हेड त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शून्यावर असताना जीवनदान मिळाल्यानंतर तो त्याचा फायदा घेऊन मोठी खेळी खेळू शकला असता. मात्र डावाच्या चौथ्या षटकात अर्शदीप सिंगनं त्याला 21 धावांवर बाद करून मोठं संकट टाळलं.
कागिसो रबाडाच्या पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडनं मोठ-मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली होती. त्यानं रबाडाच्या पहिल्या षटकात चौकार हाणला. त्यानंतर रबाडा जेव्हा तिसरं षटक टाकण्यासाठी आला तेव्हा त्यानं सलग 3 चौकार मारत 16 धावा ठोकल्या. त्यावेळी असं वाटत होतं की, शिखर धवननं सामन्याच्या पहिल्या चेंडूवर रिव्हू घ्यायला हवा होता. मात्र चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगनं हेडला बाद केलं. तो धवनच्या हाती झेलबाद झाला. त्यानं 15 चेंडूत 21 धावा केल्या.
अर्शदीप सिंगनं त्याच षटकात आणखी एक बळी घेतला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्यानं भरवशाचा फलंदाज एडन मार्करमलं माघारी पाठवलं. मार्करम दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. विकेटकीपर जितेश शर्मानं त्याचा झेल घेतला. अर्शदीपनं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 6 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांसाठी वाईट बातमी, अनेक विदेशी खेळाडू आयपीएलच्या मध्यावरच सोडतील संघाची साथ
पंजाबनं हैदराबादविरुद्ध टॉस जिंकला, कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11; जाणून घ्या