आयपीएलमध्ये आज 2 सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान असेल. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल खेळणार का? तसेच खेळपट्टीचा अहवाल आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या.
सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे. या विकेटवर फलंदाज सहज धावा करतात. गेल्या मोसमात सनरायजर्स हैदराबादनं येथे राजस्थान रॉयल्ससमोर 214 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. याशिवाय या विकेटवर सातत्यानं 200 हून अधिक धावा होतात. या मैदानावर संघांना धावांचा पाठलाग करायला आवडतं. आतापर्यंत झालेल्या 52 आयपीएल सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 34 वेळा विजय मिळवला आहे.
आतापर्यंत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये तीनदा आमनेसामने आले आहेत, राजस्थान रॉयल्सनं 2 वेळा विजय मिळवला आहे, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सनं एकदा विजय नोंदवलाय.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर क्विंटन डी कॉक आणि देवदत्त पडिक्कल सलामीला येऊ शकतात. तर मधल्या फळीत दीपक हुडा, केएल राहुल, निकोलस पूरन आणि आयुष बदोनीसारखे फलंदाज असतील. याशिवाय मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पांड्या हे अष्टपैलू म्हणून खेळतील. तर गोलंदाजीची जबाबदारी नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांच्यावर असेल.
लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, दीपक हुडा, केएल राहुल (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बदोनी, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, यश ठाकूर, रवी बिश्नोई.
दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनच्या हाती असेल. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीवीर असतील. यानंतर संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ध्रुव जुरेलसारखे फलंदाज येतील. त्याचबरोबर या संघात रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट सारखे दर्जेदार गोलंदाजही आहेत.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ध्रुव जुरेल, आर अश्विन, युजवेंद्र चहल, आवेश खान, ट्रेंट बोल्ट.
महत्त्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा
गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान! पाहा दोन्ही संघाची हेड टू हेड आकडेवारी