आयपीएल 2024 च्या 30व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हैदराबादनं बंगळुरूवर 25 धावांनी विजय मिळवला आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 3 विकेट गमावून 287 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात, बंगळुरू 20 षटकांत 7 गडी गमावून 262 धावाच करू शकली. सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचली. यापूर्वी याच मोसमात हैदराबादनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा बनवल्या होत्या. आता त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
288 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीनं आक्रमक सुरुवात केली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यात 38 चेंडूत 80 धावांची भागिदारी झाली. कोहली 20 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. त्यानं 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. फाफ डू प्लेसिसनं अर्धशतक झळकावलं. तो 28 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले.
विकेटकीपर दिनेश कार्तिक एका टोकानं तुफान फटकेबाजी करत होता. तो 35 चेंडूत 83 धावा करून तंबूत परतला. 19व्या षटकात टी. नटराजननं त्याला बाद केलं. कार्तिकनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकार मारले.
या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावलं. मात्र तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडू शकला नाही. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू ख्रिस गेलनं (30 चेंडू) ठोकलं आहे. हेडनं त्याच्या खेळीत 8 षटकार आणि 9 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 255 होता. ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात 41 चेंडूत 102 धावांची खेळी केली.
त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेननं 31 चेंडूत 67 धावा केल्या. हैदराबादच्या डावाच्या सुरुवातीला अभिषेक शर्मानं 22 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. शेवटी एडन मार्करम आणि अब्दुल समद यांनी तुफानी फलंदाजी केली. मार्करमनं 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अब्दुल समदनं 10 चेंडूत 37 धावांची झंझावाती खेळी केली.
आरसीबीकडून लोकी फर्ग्युसननं 4 षटकात 52 धावा देत 2 बळी घेतले. रीस टॉपलीनं 4 षटकांत 68 धावा देत 1 बळी घेतला. विजय कुमार वैशाख आणि यश दयाल यांनीही आपापल्या 4 षटकात 50 हून अधिक धावा दिल्या. आरसीबीचा असा एकही गोलंदाज नाही ज्यानं 10 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार वैशाख, रीस टॉपली, लोकी फर्ग्युसन, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी
महत्त्वाच्या बातम्या –
7 षटकार, 2 चौकार; चिन्नास्वामीवर पुन्हा आलं हेनरिक क्लासेनचं वादळ!
ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले