आयपीएल 2024 च्या साखळी फेरीचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा घातल्यानं हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला.
केकेआरचा संघ 14 सामन्यांमध्ये 20 गुणांची कमाई करत गुणतालिकेत शीर्ष स्थानी राहिला. तर राजस्थान रॉयल्सचं या सामन्यात माेठं नुकसान झालं. राजस्थानचे 14 सामन्यांमध्ये 17 गुण आहेत. तरीही संघाची तिसऱ्या स्थानावरती घसरण झाली. राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या दोन्ही संघांचे 17-17 गुण आहेत. परंतु हैदराबाद चांगल्या नेट रन रेटमुळे गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरती पोहचला.
आयपीएलच्या या हंगामात प्ले-ऑफमधील टाॅप-4 संघ पक्के झाले आहेत. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावरती असलेले संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद 21 मे रोजी क्वालीफायर 1 मध्ये भिडतील. क्वालीफायर 1 सामन्यातील विजेता संघ सरळ फायनल मध्ये एंट्री करेल. तर हरलेल्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये खेळावं लागेल.
एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल, त्या संघाचा प्ले-ऑफ फेरीतून पत्ता कट होणार आहे. तर जो संघ जिंकेल तो संघ क्वालीफायर 1 मध्ये पराभव झालेल्या संघासोबत क्वालीफायर 2 मध्ये भिडेल. क्वालीफायर 2 जो संघ जिंकेल तो फायनलसाठी पात्र ठरेल.
रविवारी, राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात पावसामुळे रात्री 10:30 वाजता नाणेफेक झाली. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामना 7-7 षटकांचाच ठेवण्यात आला होता. परंतु रात्री 10:38 वाजता पुन्हा पावसानं व्यत्यय आणला. त्यानंतर पंचांनी हा सामना रद्द घोषित केला.
राजस्थाननं या हंगामात धडाकेबाज सुरुवात केली होती. परंतु 9 सामन्यांनंतर त्यांनी सलग 4 सामने गमावले. त्यामुळे राजस्थानचा नेट रन रेट ढासळला. यामुळे त्यांची गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
17 वर्षांत असं प्रथमच घडलं! आयपीएलमध्ये पंजाब किंग्जनं रचला अनोखा इतिहास; जाणून घ्या
आधी सलग 6 पराभव…मग सलग 6 विजय! आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कमबॅकचे हे आहेत 5 शिल्पकार