आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी एका वेगळ्याच टचमध्ये दिसत आहे. संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आयपीएलच्या या हंगामात हैदराबादसाठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. हेडनं डावाच्या 12 व्या षटकात विजय कुमार वैषाकच्या चेंडूवर चौकार मारून अवघ्या 39 चेंडूत शतक पूर्ण केलं. आपल्या या खेळीत त्यानं 9 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार ठोकले.
ट्रॅव्हिस हेड आता आयपीएलच्या चालू हंगामात शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली, जोस बटलर आणि रोहित शर्मा यांनी शतकं झळकावली होती. तसेच तो आयपीएल 2024 मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी विराट कोहलीनं 67 चेंडू, रोहित शर्मानं 61 चेंडूत आणि जोस बटलरनं 58 चेंडूत शतक झळकावलं होतं.
ट्रॅव्हिस हेडनं आरसीबीविरुद्ध अवघ्या 39 चेंडूत शतक पूर्ण केलं. हे आयपीएलच्या इतिहासातील चौथं सर्वात जलद शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत ख्रिस गेल (30 चेंडू), युसूफ पठाण (37 चेंडू) आणि डेव्हिड मिलर (38 चेंडू) त्याच्या पुढे आहेत. यासह ट्रॅव्हिस हेड आता सनरायझर्स साठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी, हैदराबादसाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. त्यानं 2017 मध्ये केकेआर विरुद्ध 43 चेंडूत शतक झळकावलं होतं.
ट्रॅव्हिस हेड आता आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. त्यानं 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 42 चेंडूत शतक झळकावलं होतं.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल, ज्यानं 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना केवळ 30 चेंडूत शतक झळकावलं होतं. युसूफ पठाणनं 2010 मध्ये अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेचा झंझावाती फलंदाज डेव्हिड मिलरनं 2013 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना 38 चेंडूत शतक झळकावलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या
आकाशाकडे डोळे अन् छातीवर हात…विकेट घेतल्यानंतर पाथिराना असं सेलिब्रेशन का करतो?