सोमवारी (22 एप्रिल) आयपीएल 2024 च्या 38व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सनं या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थाननं हे लक्ष्य 18.4 षटकांत 1 गडी गमावून गाठलं.
राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरनं 25 चेंडूत 35 धावा केल्या. त्यानं 6 चौकार लगावले. पीयूष चावलानं त्याला बोल्ड केलं. कर्णधार संजू सॅमसननं 28 चेंडूत नाबाद 38 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर यशस्वी जयस्वालनं तुफानी शतक ठोकलं. तो 60 चेंडूत 104 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 9 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा काही कमाल करू शकला नाही. तो 5 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टनं त्याची विकेट घेतली. ईशान किशन शून्यावर तंबूत परतला. तर सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.
मुंबईनं केवळ 20 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. चौथा धक्का 52 धावांवर बसला. मात्र त्यानंतर तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांनी 52 चेंडूत 99 धावांची भागीदारी करत संघाला सावरलं. तिलकनं 45 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. तर वढेरानं 29 चेंडूत 49 धावांचं योगदान दिलं. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं 9 गडी गमावून 179 धावा केल्या.
राजस्थानकडून वेगवान गोलंदाज संदीप शर्मानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांत केवळ 18 धावा देत 5 बळी घेतले. ट्रेंट बोल्टनं 4 षटकांत 32 धावा देत 2 बळी घेतले. तर आवेश खान आणि युजवेंद्र चहल यांना 1-1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, नेहाल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – नुवान तुषारा, आकाश मधवाल, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेव्हिस
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, केशव महाराज, शुभम दुबे, नवदीप सैनी, टॉम कोहलर-कॅडमोर
महत्त्वाच्या बातम्या –
छोटा पॅकेट, मोठा धमाका! राजस्थानविरुद्ध संकटमोचक बनून आला तिलक वर्मा, ठोकलं झंझावाती अर्धशतक
संदीप शर्मा समोर येताच सूर्या विसरतो बॅटिंग! आकडेवारी एवढी खराब की विश्वासच बसणार नाही
युजवेंद्र चहलची ऐतिहासिक कामगिरी! बनला आयपीएलमध्ये 200 विकेट पहिला गोलंदाज