आयपीएल 2024 च्या 50व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रायल्सचा एका धावेनं पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 20 षटकांत 3 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थानची टीम 20 षटकांत 200 धावाच करू शकली.
अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती. मात्र अश्विन आणि रोव्हमन पॉवेलची जोडी या धावा करू शकली नाही. भुवनेश्वर कुमारनं अखेरच्या षटकात केवळ 11 धावा दिल्या. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती. मात्र भुवीनं पॉवेलची विकेट घेत हैदराबादला सामना जिंकवून दिला.
धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात राजस्थानला दोन झटके दिले. फॉर्ममध्ये असलेला जोस बटलर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्या पाठोपाठ कर्णधार संजू सॅमसनही शून्यावर तंबूत परतला. एकवेळ राजस्थानची अवस्था एका धावेवर 2 गडी बाद अशी दयनीय झाली होती.
येथून यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग या युवा फलंदाजांच्या जोडीनं संघाला सावरलं, या दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी 78 चेंडूत 134 धावांची भागीदारी झाली. या दोघांनी संघाची पडझड थांबवून स्कोरबोर्ड सतत हलता ठेवला. यशस्वी 40 चेंडूत 67 धावा करून बाद झाला. नटराजननं त्याची विकेट घेतली. यशस्वीनं आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. यानंतर रियान परागचही विकेट गेली. तो 49 चेंडूत 77 धावा करून पॅट कमिन्सचा बळी ठरला. हेटमायर 9 चेंडूत 13 धावा करून परतला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 3 गडी गमावून 201 धावा केल्या. संघानं 35 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी 57 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली. नितीशनं 42 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. तर हेडनं 44 चेंडूत 58 धावा केल्या.
नितीशनं 30 चेंडूत तर हेडनं 37 चेंडूत अर्धशतक ठोकलं. अखेरीस हेनरिक क्लासेननं मोठे फटके मारत 19 चेंडूत 42 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 200 पार नेली. राजस्थान रॉयल्सकडून वेगवान गोलंदाज आवेश खाननं सर्वाधिक 2 बळी घेतले. संदीप शर्माला 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, मयंक मार्कंडे, एडन मार्करम, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, तनुष कोटियन
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर रोहित शर्मानं घेतली रिंकू सिंहची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण