आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज सध्या गुणतालिकेत 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबाद 3 सामन्यांत 2 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या नजरा विजयाकडे असतील, मात्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादसाठी एक वाईट बातमी आहे.
वास्तविक, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध महेंद्रसिंह धोनीची बॅट चांगलीच तळपते. आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं. कॅप्टन कूलनं या संघाविरुद्ध शानदार फलंदाजी केली आहे. महेंद्रसिंह धोनीनं आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 48.8 ची सरासरी आणि 145.24 च्या स्ट्राईक रेटनं धावा ठोकल्या आहेत.
यंदाच्या हंगामामध्ये धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, मात्र या सामन्यात धोनीनं शानदार फलंदाजी केली होती. माहीनं 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या होत्या. त्यानं आपल्या या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार हाणले होते.
या दोन्ही संघांच्या हेड टू हेड बद्दल बोलायचं झालं तर, सीएसकेचं वर्चस्व स्पष्टपणे दिसतं. दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळले गेले असून, ज्यापैकी चेन्नईनं 14 तर हैदराबादनं फक्त 5 सामने जिंकले आहेत. या हांगामात चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत 2 विजय मिळाले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईनं पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.
जर आपण सनरायझर्स हैदराबादबद्दल बोललो तर त्यांना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतर त्यांनी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. मात्र, हा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यात अपयशी ठरला. शेवटच्या सामन्यात त्यांचा गुजरात टायटन्सनं 7 गडी राखून पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-