आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. यावेळी हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होईल. याआधी लिलावासाठी 574 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यात आता आणखी काही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, बीसीसीआयनं मेगा लिलावाच्या वेळेत बदल केल्याची बातमी समोर आली आहे. याआधी खेळाडूंचा लिलाव भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार होता. मात्र आता ही वेळ अर्ध्या तासानं वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता मेगा लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. प्रसारकांच्या विनंतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
वास्तविक, ज्या दोन दिवसांत आयपीएल 2025 चा मेगा लिलाव होणार आहे, त्या दोन दिवसात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पर्थ कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ होणार आहे. कसोटीचं तिसरं सत्र भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:50 वाजता संपेल. मात्र कधीकधी खराब प्रकाश किंवा खराब हवामानामुळे आणि संथ षटकांची भरपाई करण्यासाठी वेळ वाढवला जातो. या कारणास्तव, संघर्षाची परिस्थिती टाळण्यासाठी प्रसारकांनी वेळ वाढवण्याची विनंती केली, जी बीसीसीआयनं मान्य केली आहे.
आयपीएल 2025 मेगा लिलावाचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार डिस्ने स्टारकडे आहे. जर लिलावाच्या वेळेची टक्कर कसोटीच्या वेळेशी झाली, तर डिस्ने स्टारला तोटा सहन करावा लागू शकतो. म्हणून लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला.
आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नावं पाठवली होती. त्यापैकी केवळ 574 खेळाडू निवडले गेले. यानंतर, जोफ्रा आर्चर देखील मेगा लिलावाचा भाग असेल अशी माहिती मिळाली. आता त्याच्यासोबत अमेरिकेचा सौरभ नेत्रावळकर आणि मुंबईचा हार्दिक तामोरे यांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे आता एकूण 577 खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
हेही वाचा –
शुबमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अपडेट, जाणून घ्या कधी मैदानात परतणार
हा कसला किंग? ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीची बॅट चालेना, पुन्हा एकदा स्वस्तात बाद!
IND VS AUS; थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ! केएल राहुल बाद की नाबाद? तुम्हीच सांगा, पाहा VIDEO