चेन्नई सुपर किंग्जने (CSK) शनिवारी झालेल्या आयपीएल 2026 च्या 18व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला (DC) 23 धावांनी पराभूत करत अखेर विजयाची चव चाखली. सलग तीन पराभवांनंतर सीएसकेसाठी हा मोठा दिलासा ठरला, तर दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. गायकवाड 18 चेंडूत 15 धावा करून बाद झाला, पण त्यानंतर संजू सॅमसनने आक्रमक फलंदाजी करत सामना पूर्णपणे सीेएसकेच्या बाजूने वळवला. त्याने 56 चेंडूत नाबाद 113 धावा ठोकल्या. या खेळीत 15 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील चौथी शतकी खेळी ठरली आणि सीएसकेसाठी पहिलं शतकही ठरलं.
आयुष म्हात्रेने देखील उत्तम साथ देत 36 चेंडूत 59 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. अखेरीस सीएसकेने 20 षटकांत 2 बाद 212 धावा उभ्या केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने एकमेव विकेट घेतली.
213 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. केएल राहुल आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. राहुल 18 धावांवर बाद झाला, तर निसांका 41 धावा करून माघारी परतला. मात्र त्यानंतर दिल्लीची फलंदाजी सातत्याने कोसळत गेली.
अक्षर पटेल केवळ 1 धाव करू शकला, तर समीर रिझवी 6 धावांवर बाद झाला. डेविड मिलरने 17 धावा केल्या, तर आशुतोषने 19 धावांची भर घातली. ट्रिस्टन स्टब्सने एकाकी झुंज देत 60 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
सीएसकेकडून जेमी ओव्हर्टनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी घेतले. अंशुल कंबोजनेही प्रभावी कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या आणि दिल्लीची फलंदाजी गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर दिल्लीचा डाव 20 षटकांत 189 धावांवर संपुष्टात आला.. या विजयामुळे CSK चा आत्मविश्वास वाढला असून आगामी सामन्यांसाठी संघ मजबूत स्थितीत परतला आहे.





