आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात ८ संघ आहेत. यामध्ये शनिवारी (१६ मे) ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स भिडले. सलग पाच सामने जिंकत केकेआरशी दोन हात करणाऱ्या जीटीला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांना गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी शेवटचा राहिलेला सामना जिंकणे आवश्यक आहे. प्रश्न हा आहे की चेन्नई, पंजाब, बंगळुरू, हैद्राबाद आणि राजस्थान यांचा पराभव करणारा गुजरात कोलकातासमोर कसा काय पराभूत झाला, यामागचे कारण त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी सांगितले आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि जीटीचे सहाय्यक प्रशिक्षक पटेल यांनी सामन्यानंतर म्हटले की, ईडन गार्डन्सवर झालेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात झेल घेणे हाच दोन्ही संघांमधील फरक होता. जीटीने हा सामना २९ धावांनी गमावला, यानंतर पटेल हे पत्रकार परिषदेत म्हणाले, “मला वाटते की झेल घेण्यामुळे स्पष्टपणे खूप फरक पडला. जेव्हा तुम्ही मोठ्या धावसंख्येचा सामना खेळत असता, जेव्हा तुम्ही चांगल्या फलंदाजांविरुद्ध खेळत असता, तेव्हा तुम्हाला फारशा संधी मिळच नाहीत. जेव्हा संधी मिळते, तेव्हा चेंडू पकडण्याची खात्री तुम्हाला करावी लागते आणि हाच फरक या सामन्यात होता.”
जीटीचे क्षेत्ररक्षण पाहिले तर त्यांच्या खेळाडूंनी केकेआरसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या तिन्ही फलंदाजांचे झेल सोडले. ३५ चेंडूंमध्ये ९३ धावा करणाऱ्या फिन ऍलनचा ३३ धावांवर मोहम्मद सिराजने झेल सोडला. कॅमेरॉन ग्रीन २३ धावांवर असताना अर्शद खानने त्याचा झेल सोडला आणि पुढे ग्रीनने २८ चेंडूंत ५२ धावा केल्या. त्याचबरोबर अंगकृष रघुवंशीचा झेल ५३ धावांवर असताना वॉशिंग्टन सुंदरने सोडला. नंतर तो ८२ धावा करत नाबाद राहिला. त्यामुळे केकेआरची धावसंख्यांही २५० च्या जवळ पोहोचली.
जीटीचे क्षेत्ररक्षण खराब होते, मात्र केकेआरने चांगली फलंदाजी केली. त्यांच्या खेळाडूंचे कौतुक करताना पटेल म्हणाले, “फिन ऍलनने चांगली खेळी केली. मला वाटते खेळपट्टी सोपी नव्हती. आमच्याकडे गुणवत्ता आणि वेगवान गोलंदाजीचे आक्रमण आहे. तो त्यांच्याविरुद्ध (रबाडा आणि सिराज) उत्तम खेळला.”
या सामन्यात केकेआरने २० षटकांत २ विकेट्स गमावत २४७ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात जीटीने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१८ धावसंख्या केली.






