आयपीएल 2026 चा 19वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठ्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे स्पर्धेला धक्का बसला आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात उद्घाटनाचा सामना रंगणार असताना, जवळपास सहा नामांकित खेळाडू स्पर्धेबाहेर गेले आहेत. काही खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याने संघरचनेवरही परिणाम होणार आहे.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी दुखापतीमुळे आयपीएल 2026 च्या पहिल्या दोन आठवड्यांत खेळू शकणार नाहीत. फ्रँचायझीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, धोनी सध्या पुनर्वसन प्रक्रियेत असून पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर धोनी फक्त आयपीएलमध्येच खेळत आहे, त्यामुळे त्याची फिटनेस कायम ठेवणे अधिक आव्हानात्मक ठरत आहे.
परदेशी खेळाडूंच्या दुखापतीचाही स्पर्धेवर मोठा परिणाम झाला आहे. नुवान तुषारा फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्याने त्याला अद्याप एनओसी मिळालेली नाही, त्यामुळे तो किमान दोन सामने खेळू शकणार नाही. तसेच मथीशा पथिराना आणि वनिंदू हसरंगा हे दोघेही सध्या दुखापतीशी झुंज देत आहेत. हसरंगा लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहेत, तर पथिरानाला कोलकाता नाईट रायडर्सने मोठ्या रकमेत संघात सामील केले आहे. मात्र, तो एप्रिलच्या मध्यापर्यंतच संघात दाखल होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनाही दुखापतीने ग्रासले आहे. पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीतून सावरत असून त्यांच्या अनुपस्थितीत ईशान किशन सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करणार आहे. तसेच जोश हेझलवूड सुरुवातीचे सामने मुकणार आहे. दुसरीकडे, मिचेल स्टार्क गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
एकूणच, आयपीएल 2026 च्या सुरुवातीलाच दुखापतींचे सावट दिसत असून, पुढील सामन्यांमध्ये संघांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.






