कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना हा नेहमीच एक थरारक मुकाबला असतो. १९व्या आयपीएल हंगामातील सहाव्या सामन्यात, म्हणजेच २ एप्रिल रोजी, हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत आणि दोन्ही संघांचे लक्ष आपली पहिलीवहिली विजयाची नोंद करण्यावर ठामपणे केंद्रित झाले आहे.
मात्र, या हंगामाची सुरुवात दोन्ही फ्रँचायझींसाठी निराशाजनक ठरली. विशेष म्हणजे, २०० हून अधिक धावांची मोठी धावसंख्या उभारूनही पराभवाचा सामना करावा लागणे, ही बाब दोन्ही संघांसाठी एक मोठा धक्का ठरली. हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला, तर कोलकाताला मुंबई इंडियन्सकडून मात मिळाली. परिणामी, या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ आपली सर्व ताकद पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दोन्ही संघांमधील ‘हेड-टू-हेड’ पाहिले तर पारडे स्पष्टपणे कोलकाताच्या बाजूने झुकलेले दिसते. आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या ३० सामन्यांपैकी, केकेआरने हैदराबादचा तब्बल २० वेळा पराभव केला आहे, तर एसआरएचला (SRH) केवळ १० विजय मिळवता आले आहेत. मात्र, मागील हंगामात हे दोन्ही संघ बरोबरीच्या स्थितीत होते. त्यावेळी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला होता.
आपल्या घरच्या मैदानावर खेळताना केकेआर (KKR) अधिक आक्रमक शैलीचे क्रिकेट खेळताना दिसून येते. या मैदानावर खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांपैकी, कोलकाताने ८ वेळा विजय मिळवला आहे, तर हैदराबादला केवळ ३ वेळाच यशाची चव चाखता आली आहे. हा सामना आज सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. तर टाॅस 30 मिनिट आधी 7 वाजता होईल.






