कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) खेळाडू आयपीएल २०२६ च्या हंगामाआधी दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेबाहेर झाले आहेत. त्यामध्ये वेगवान गोलंदाज आकाश दीप याचाही सहभाग आहे. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार या चर्चा सुरू झाल्या होत्या. आता त्याचे उत्तर मिळाले आहे. सौरभ दुबे याला संघात सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, विदर्भाचा वेगवान गोलंदाज दुबे आकाश दीपची जागा घेणार असल्याचे समोर येत आहे. २८ वर्षाचा हा खेळाडू डावखुरा गोलंदाज आहे. केकेआरने अद्याप त्याच्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच तो आधीपासूनच केकेआरच्या शिबिरात सराव करत आहे.
सौरभ २०१९ मध्ये राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ ‘एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कप’साठी बांग्लादेशला गेला होता. नेपाळविरुद्धच्या लिस्ट ए च्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने भारतासाठी २६ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. तो सामना भारताने जिंकला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला गेला. त्यामध्ये त्याने ३ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या.
माजी राष्ट्रीय निवडकर्ता सुब्रतो बॅनर्जी नागपूरमध्ये सौरभवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी माध्यमांना सांगितले की, सौरभला खेळपट्टीवरून अतिरिक्त उसळी मिळते. त्याच्यात चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्याची क्षमता आहे, जी टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकते. त्याने २०२३-२४ च्या देशांतर्गत हंगामात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व केले होते.
सौरभला आयपीएल २०२२ च्या लिलावात २० लाख रुपयांना विकत घेतल्यानंतर तो सनरायझर्स हैद्राबाद संघाचा भाग होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच त्याने आयपीएल पदार्पणही झालेले नाही. त्याने लिस्ट ए चे ८ सामने खेळले असून १६ विकेट्स घेतल्या आहेत.
आकाश दीपला पाठीची गंभीर दुखापत झाल्याने तो बेंगलोरच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये रिहॅबिलिटेशनसाठी आहे. त्याला त्या दुखापतीतून सावरण्यासाठी जवळपास तीन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम आणि जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटीलाही मुकणार आहे.






