---Advertisement---

IPL2026: विराट कोहलीसह दिग्गजांच्या यादीत समीर रिझवीचा समावेश; केला ‘हा’ भीमपराक्रम

On: रविवार, एप्रिल 5, 2026 11:33 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सच्या समीर रिझवीने 2026च्या आयपीएल हंगामाची किती जबरदस्त सुरुवात केली आहे. दिल्लीने या हंगामात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यात दोन्ही सामन्यात विजय मिळवले आहेत. दिल्लीच्या या वर्चस्वपूर्ण कामगिरीमागील गुपित दुसरे-तिसरे कोणी नसून खुद्द समीर रिझवीच आहे. दिल्लीसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, रिझवीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 47 चेंडूंत 5 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावांची खेळी केली. हीच लय कायम राखत, त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 51 चेंडूंत 7 चौकार आणि तितक्याच षटकारांच्या साहाय्याने 90 धावांची शानदार खेळी साकारली. या दोन्ही खेळींसाठी रिझवीला सामनावीर (Player of the Match) किताबाने गौरवण्यात आले.

दिल्लीने 2025च्या आयपीएलमधील आपला शेवटचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात रिझवीने अवघ्या 25 चेंडूंत नाबाद 58 धावांची खेळी केली होती.

या कामगिरीसह, समीर रिझवीने सलग तीन सामनावीर पुरस्कार जिंकत एक प्रकारची हॅट्ट्रिकच पूर्ण केली आहे. आयपीएलच्या इतिहासात सलग तीन सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो आठवा खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम गाठणारा यापूर्वीचा शेवटचा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड होता, ज्याने 2020 मध्ये ही कामगिरी केली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हा आयपीएलच्या इतिहासात सलग तीन सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्याने 2010मध्ये हा उल्लेखनीय पराक्रम गाठला होता. त्यानंतर, 2016च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीनेही या विशेष यादीत आपले स्थान निश्चित केले.

सलग तीन आयपीएल सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार

जॅक कॅलिस (RCB) – 2010
वीरेंद्र सेहवाग (DD) – 2012
ग्लेन मॅक्सवेल (KXIP) – 2014
ॲरॉन फिंच (GL) – 2016
विराट कोहली (RCB) – 2016
जॉस बटलर (RR) – 2018
ऋतुराज गायकवाड (CSK) – 2020
समीर रिझवी (DC) – 2026

सलग दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा नायक ठरलेला समीर रिझवी, सध्या आयपीएल 2026 मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आतापर्यंत, त्याने केवळ दोन सामन्यांमध्येच 160 धावा केल्या आहेत. आयपीएल 2026मध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---