आज(18 डिसेंबर) जयपूरमध्ये आयपीएल 2019चा लिलाव सुरु आहे. या लिलावात युवा खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली आहे. मात्र अनेक दिग्गज क्रिकेटपटूंवर पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने बोलीच लावली नाही. यामध्ये युवराज सिंग, डेल स्टेन, ब्रेंडन मॅक्यूलम असे खेळाडू आहेत.
या दिग्गज क्रिकेटपटूंना पहिल्या फेरीत लागली नाही बोली-
ब्रेंडन मॅक्यूलम- आयपीएलच्या पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात 158 धावांची आक्रमक खेळी करणारा मॅक्यूलम यावर्षी मात्र पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला आहे. तो आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून खेळत आहे.
त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 109 सामन्यात 27.70 च्या सरासरीने 2881 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षीच्या आयपीएल लिलावात त्याची 2 कोटी ही मुळ किंमत आहे.
युवराज सिंग – भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणारा युवराज सिंगही यावर्षीच्या आयपीएल लिलावात पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला आहे. त्याची यावर्षीची मुळ किंमत 1 कोटी रुपये आहे.
युवराजची मागील काही महिन्यांपासून चांगली कामगिरी झाली नसल्याने त्याला याचा फटका बसला आहे. त्याला मागील वर्षीही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 2 कोटी या मुळ किंमतीत संघात घेतले होते.
पण युवराजचा आयपीएलमधील अनुभव पाहता संघ त्याला पुढील फेरीत बोली लावण्याचा विचार करु शकतात. युवराजने 128 सामने आयपीएलमध्ये खेळले असून यात 2652 धावा आणि 36 विकेट्स घेतल्या आहेत.
शॉन मार्श – आयपीएलच्या पहिल्या लिलावात सर्वाधिक धावा करणारा शॉन मार्श यावर्षीच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला आहे. त्याची यावर्षीच्या आयपीएलसाठी 2 कोटी ही मुळ किंमत आहे.
मार्शची आॅस्ट्रेलियाच्या संघाकडूनही मागील काही सामन्यात चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे त्यालाही खराब कामगिरीचा फटका आयपीएलमध्ये बसला आहे. मार्शने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 71 सामन्यात 39.95 च्या सरासरीने 2477 धावा केल्या आहेत.
मार्श 2018 च्या आयपीएल लिलावातही अनसोल्ड राहिला होता.
डेल स्टेन- दक्षिण आफ्रिका संघात वेगाने धडाडणारी स्टेनगन यावर्षीच्या आयपीएल लिलावात मात्र खास काही करु शकलेली नाही. स्टेनला मागील वर्षीही आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने संघात घेतले नव्हते.
स्टेनकडे 90 आयपीएल सामन्यात खेळताना 25.6 च्या सरासरीने 92 विकेट्स घेतल्या आहेत. पण युवा खेळाडूंवर मोठी बोली लावणारे संघ स्टेन सारख्या अनुभवी खेळाडूवर पुढील फेरीत बोली लावणार का की यावर्षीही स्टेन अनसोल्ड राहणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ख्रिस वोक्स – इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स हा देखील यावर्षीच्या आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला आहे. तो मागील दोन मोसमापासून आयपीएलमध्ये खेळत आहे.
त्याने 2017 आणि 2018 च्या आयपीएलमध्येही खेळताना कोलकता नाइट रायडर्स संघाकडून चांगली कामगिरी केली होती. पण त्याला यावर्षी कोणत्याही संघाने पहिल्या फेरीत बोली लावण्यासाठी पसंती दर्शवलेली नाही. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 18 सामने खेळताना 25 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप १० खेळाडू
–कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा
–शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू