चेन्नई। गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीगच्या २०२१ हंगामाचा म्हणजे आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात २९२ खेळाडूंचा समावेश होता. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरही बोली लागली.
अर्जुनला मुंबई इंडियन्स संघाने २० लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. अर्जुनला इतर कोणत्याही संघाने पसंती दाखवली नाही. त्याची २० लाख ही मुळ किंमत होती.
https://twitter.com/IPL/status/1362412229090570242
अर्जुनने याचवर्षी सुरुवातील मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून देशांतर्गत क्रिकेटच्या वरिष्ठ स्तरावर पदार्पण केले होते. त्याआधी तो मुंबईकडून वयोगटातील क्रिकेटमध्ये खेळला आहे. याशिवाय नुकतेच त्याने पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट ‘अ’च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात त्याने आपल्यातील अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली.
या सामन्यात त्याने फिरकीपटू हाशिफ दाफेदारच्या एकाच षटकात ५ शानदार षटकार मारले. तर पूर्ण सामन्यादरम्यान अवघ्या ३१ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ७७ धावा चोपल्या. सोबतच ४१ धावा देत ३ विकेट्सही काढल्या होत्या.
याशिवाय अर्जून १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून ४ दिवसीय कसोटी सामने देखील खेळला आहे. विशेष म्हणजे अर्जूनचे वडील सचिन तेंडुलकरनेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स प्रतिनिधित्व केले आहे.
अर्जुन तेंडूलकरची क्रिकेट कारकिर्द-
अर्जुनने आजपर्यंत कोणताही प्रथम श्रेणी अथवा अ दर्जाचा सामना खेळलेला नाही. परंतू त्याने दोन ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले असून हे दोनही सामने तो मुंबईकडून खेळला आहे. १५ जानेवारी रोजी हरियाणा व १७ जानेवारी रोजी पॉंडेचरी संघाविरुद्ध तो हे सामने खेळला असून त्याचे व्यावसायिक क्रिकेट केवळ दोन सामन्यांचे आहे.






