आयपीएलला जगातिल सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. आयपीएलमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू खेळतात. २०२२ मध्ये या स्पर्धेचा रोमांच अधिकच वाढणार आहे. पुढच्या आयपीएल हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव आयोजित केला गेला आहे. मेगा लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लागताना दिसणार आहे. आपण या लेखात अशाच पाच अनुभवी खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्यावर आयपीएल २०२२ साठी मोठी बोली लागू शकते.
डेव्हिड वॉर्नर (David Warner)
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला त्याची आयपीएल फ्रेंचायजी सनरायझर्स हैदराबादने पुढच्या हंगामासाठी रिटेन केले नाही. मागच्या आयपीएल हंगामात त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले होते, तसेच काही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची देखील संधी मिळाली नव्हती. आयपीएलदरम्यान तो खराब फॉर्ममध्ये दिसला असला, तर नंतर टी२० विश्वचषकात मात्र त्याने जोरदार पुनरागमन केल्याचे पाहायला मिळाले होते.
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली होती. वॉर्नरच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाचे जेतेपद देखील जिंकले. यापूर्वी २०१६ आयपीएलमध्ये त्याने सनराजझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. वॉर्नरकडे १५० आयपीएल सामन्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने ५४४९ धावा केल्या आहेत. अशात ३५ वर्षीय डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मोठ्या किमतीत विकला जाणार यात शंका नाही.
शिखर धवन (shikhar dhawan)
३६ वर्षीय शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटले होते. धवन भारतीय संघाचा एक अनुभवी फलंदाज आहे आणि आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन देखील उल्लेखनीय राहिले आहे. आयपीएल २०१९ मध्ये त्याने ५२१ धावा केल्या होत्या. तसेच २०२० मध्ये ६१८ आणि २०२१ मध्ये ५८७ आयपीएल धावा केल्या होत्या. या अप्रतिम प्रदर्शनानंतर देखील त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. परंतु, आयपीएलच्या मेगा लिलावात त्याला या प्रदर्शनाचे फळ मिळू शकते. त्याचा अनुभव पाहता मेगा लिलावात फ्रेंचायझी त्याच्यावर मोठी बोली लावतील, अशी शक्यता आहे.
फलंदाजासोबत तो एक चांगला कर्णधार देखील ठरला आहे. धवनसाठी सर्वात मोठा अडथळा त्याच्या स्ट्राइक रेटचा होता, पण त्याने यावरही मात केली आहे. आयपीएल २०१९ मध्ये त्याने १३५.६७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. तसेच आयपीएल २०२० मध्ये त्याने १४४.७३ आणि २०२१ मध्ये १२४.२६ चा स्ट्राइक रेट कायम ठेवला होता. अशात आयपीएल २०२२ साठी त्याच्यवर फ्रेंचायझी मोठी बोली लावतील.
फाफ डू प्लेसिस (faf du plessis)
दक्षिण अफ्रिकेचा ३७ वर्षीय खेळाडू फाफ डू प्लेसिस याला चेन्नई सुपर किंग्जने पुढच्या हंगामापूर्वी रिलीज केले. आयपीएल २०२१ मध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. डू प्लेसिसने या हंगामातील १६ सामन्यांमध्ये ६३३ धावा केल्या होत्या. २०२० मध्येही त्याने असाच खेळ केला होता. २०२० आयपीएलमध्ये त्याने १३ सामन्यात ४४९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४०.७५ होता. या दमदार प्रदर्शनाचा फायदा त्याला आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात मिळू शकतो.
चेन्नई सुपर किंग्स संघ मेगा लिलावात मोठी बोलू लावून त्याला पुन्हा संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असू शकतो. मागच्या तीन हंगामांमध्ये डू प्लेसिसने चेन्नई संघासाठी देलेले योगदान बहुमूल्य आहे. त्यामुळे चेन्नई त्याला पुन्हा एकदा संघात सामील करू इच्छित असेल. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी नेहमीच अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवत आला आहे, अशात डू प्लेसिसला चेन्नई पुन्हा एकदा स्वतःसोबत सामील करेल, असी पूर्ण शक्यता आहे.
सुरेश रैना (suresh raina)
भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनाचा अनुभव मोठा आहे. परंतु आयपीएल २०२१ मध्ये मात्र तो कमाल करू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर चेन्नईने त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन देखील केले नाही. रैना आयपीएलमध्ये २०५ सामने खेळला आहे आणि यामध्ये ५५२८ धावा केल्या आहेत.
त्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच आयपीएल फ्रेंचायझीला होईल आणि याच कारणास्तव मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली देखील लागू शकते. तो एक चांगला फलंदाज तर आहेच, पण गोलंदाजीतही त्याचे प्रदर्शन चांगले आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये २५ विकेट्स घेतल्या आहेत.
ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo)
चेन्नई सुपर किंग्जचा अजून एक खेळाडू ड्वेन ब्रावो देखील आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी होणार आहे. मेगा लिलावात त्याच्यावर पैशाचा पाऊस पडू शकतो. याचे कारण आहे, आयपीएलमधील त्याचे यापूर्वीचे कमाल प्रदर्शन. ब्रावो नेहमीच सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू राहिला आहे. अशात पुढच्या हंगामात नक्कीच फ्रेंचायझी त्याला संघात सामील करण्याच्या प्रयत्नात असतील.
ब्रावोने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने १५१ सामन्यांमध्ये १६७ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीत देखील त्याचे आकडे समाधानकारक आहेत. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १५३७ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बदल होणारच! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून होणार भारतीय क्रिकेटची ‘नवी सुरुवात’
आयपीएल २०२२ साठी सीएसकेने निवडला कर्णधार धोनीचा उत्तराधिकारी? यंदा सांभाळणार संघाची कमान
व्हिडिओ पाहा –