जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय असणारी लीग म्हणजे आयपीएलचे आयोजन पुढील महिन्यात १९ सप्टेंबरपासून यूएईत होणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात काही ना काही वादविवाद आपल्याला पहायला मिळाले आहेत. स्पॉट फिक्सिंगव्यतिरिक्त यांमध्ये आतापर्यंत अनेक प्रकारचे स्कॅंडल्सही समोर आले आहेत. परंतु अनेक विवादांनंतरही आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग राहिली आहे. दरवर्षी जगातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. त्याचबरोबर ते आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चाहत्यांची मने जिंकतात, त्यांचे मनोरंजन करतात. आयपीएल लीगमध्ये असे अनेक वाद समोर आले आहेत, ज्यांना या स्पर्धेवर लागलेला एक डाग म्हणता येईल.
चला तर मग जाणून घेऊया त्या विवादांबद्दल…
हरभजन सिंग- एस श्रीसंत
आयपीएलच्या पहिल्या मोसमात फिरकीपटू हरभजन सिंग आणि एस श्रीसंतमध्ये झालेला वाद कदाचीतच कोणताही क्रिकेट चाहता विसरला नसेल. किंग्ज इलेव्हनचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतला मुंबई इंडियन्सचा खेळाडू हरभजन सिंगने मैदानावरच कानाखाली मारली होती. त्यासाठी त्याच्यावर ११ सामन्यांची बंदी घातली होती.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अडकले ३ क्रिकेटपटू
२०१३मध्ये खेळाडूंद्वारे मॅच फिक्सिंग करण्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर प्रत्येकी २ वर्षांसाठी बंदी घातली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून राजस्थानच्या एस श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या ३ खेळाडूंना अटक करण्यात आली होती. हे दोन्हीही संघ आयपीएलच्या ९ व्या आणि १० व्या मोसमात खेळले नव्हते. या संघांच्या जागी गुजरात लायन्स आणि पुणे सुपरजाएंट्स संघ आयपीएलच्या ९व्या आणि १० व्या मोसमात खेळले होते.
शेन वॉर्न
२०११ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्नने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे संजय दीक्षित यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर संजय यांनी वॉर्नविरुद्ध एफआयआर दाखल केली होती.
कोलकाता नाईट रायडर्स
दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीला पहिल्या ३ मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. चौथ्या मोसमात त्याला लिलावात संघात सामील न केल्यामुळे केकेआरचा सहमालक शाहरुख खानला क्रिकेट चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कोलकाताच्या गल्ल्यांमध्ये शाहरुख खानविरुद्ध जोरदार प्रदर्शन केले होते.
ललित मोदी
भारतात आयपीएलचा पाया रचण्यात माजी चेअरमन ललित मोदी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर मोदी यांचे नाव मनी लॉंड्रिंग, मॅच फिक्सिंग आणि मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्येही समोर आले होते. बीसीसीआयच्या विशेष शिस्त समितीने मोदींविरुद्ध अनेक आरोप केले होते. ललित मोदी आजही भारताबाहेर आहेत.
वेन पार्नेल आणि राहुल शर्मा
आयपीएल २०१२ मध्ये पुणे वॉरिअर्सच्या राहुल शर्मा आणि वेन पार्नेल या २ खेळाडूंना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या दोन्ही खेळाडूंना एका रेव्ह पार्टीमध्ये पकडण्यात आले होते. आयपीएल नियमांनुसार, स्पर्धेदरम्यान अशा कोणत्याही जागेवर जाणे बेकायदेशीर आहे.
शाहरुख खान
बॉलिवूड सुपरस्टार आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खानला वानखेडे स्टेडिअमवर जाण्यास ५ वर्षांची बंदी घातली होती. शाहरुख एका सुरक्षा रक्षकाशी भिडला होता. तरीही या प्रकरणात शाहरुख खानला नंतर क्लीन चीट दिली होती.
रवींद्र जडेजा
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात बंदी घातली होती. खरं तर लिलावादरम्यान राजस्थान रॉयल्स संघात गेल्यानंतर जडेजाने मुंबई इंडियन्सशी पुन्हा करार करण्याचा प्रयत्न केला होता.
कायरन पोलार्ड आणि ख्रिस गेल विवाद
आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान कायरन पोलार्डचा ख्रिस गेलसोबत शाब्दिक वाद झाला होता. पंचांनी मध्यस्थी करत पोलार्डला तोंड बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलार्डने तोंडावर चिकट पट्टी लावत मैदानात प्रवेश केला होता. ते पाहून सर्व प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.
गौतम गंभीर आणि विराट कोहली विवाद
आयपीएल २०१३च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरमध्ये सामन्यादरम्यान चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर जेव्हा २०१६ मधील हंगामात दोघांची भेट झाली, तेव्हा विराटला त्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आले. तो म्हणाला की, जे मैदानात घडले, ते मैदानातच राहुद्या, तर गंभीरने म्हटले की, कधी- कधी स्पर्धेत अशा घटना घडत असतात.
एमएस धोनी नो बॉल विवाद
एमएस धोनीला पहिल्यांदाच कोणत्यातरी सामन्यादरम्यान रागात पाहिले होते. आयपीएलच्या १२ व्या मोसमातील २५ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडिअममध्ये खेळला जात होता. सीएसकेला शेवटच्या ३ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. यादरम्यान मिचेल सँटनर फलंदाजीसाठी आला, त्याला पहिला चेंडू स्टोक्सने फुलटॉस टाकला होता. तो चेंडू पंच उल्लास गांधी यांनी नो बॉल दिला. परंतु त्याच सामन्यात मैदानावरील दुसरे पंच ब्रूस ऑक्सेनफोर्ड यांनी तो निर्णय बदलला. त्यानंतर धोनीला राग आला आणि त्याने सामन्यामध्येच मैदानात प्रवेश केला. जे पाहून सर्वच चाहत्यांना आश्चर्य झाले होते.
चेन्नई सुपर किंग्ज
आयपीएल 2018 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला त्यांचे चेन्नईतील एमए चिदम्बरम हे घरचे मैदान कावेरी पाणीवाटप विवादामुळे सोडावे लागले होते. चेन्नईने त्यांचा घरचा एकच सामना चेन्नईमध्ये खेळला. या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांमधून बूट मैदानात भिरकावण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर चेन्नईचे सर्व घरचे सामने पुण्यात झाले.
पाणी कमतरतेचे प्रकरण
आयपीएलच्या 2016 ला झालेल्या 9 व्या मोसमात पाणी कमतरतेच्या प्रकरणामुळे वाद झाले होते. महाराष्ट्रात त्यावेळी पडलेल्या दुष्काळामुळे मुबंई सुप्रीमकोर्टाने आयपीएलचे मुंबई आणि पुण्याचे मिळून 13 सामने बाहेर हलवण्याचे आदेश दिले होते.
ट्रेंडिंग लेख –
-कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये ‘या’ ५ खेळाडूंनी केल्यात सर्वाधिक धावा; गेलच्या आसपासही नाही कुणी
-आयपीएल इतिहासात एकदाही विजेता ठरला नाही ‘हा’ संघ, यंदा या ४ कारणांमुळे होऊ शकतो विजेता
-आयपीएल २०२०: युएईच्या मैदानावर ‘हे’ ५ स्पिनर दाखवू शकतात कमाल, ३ भारतीयांचा समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
-गांगुलीच्या निवृत्तीनंतर युवराजला कसोटीत मिळाली होती संधी पण यामुळे संपली कसोटी कारकीर्द
-युजवेंद्र चहलचा झाला साखरपूडा! सोशल मीडियावर शेअर केले फोटो
-हार्दिकच्या मुलाला क्रिकेटर बनवण्यासाठी कृणाल पंड्याने सुरु केली तयारी; शेअर केला हा खास विडिओ