आयपीएल पर्व १०ला आजपासून सुरुवात होणार आहे. आज बेंगलोर विरुद्ध गतविजेता हैद्राबाद संघ यांच्यातील सामान्याने या पर्वाचं रणशिंग फुंकल जाणार आहे. दुखापतीमुळे मोठं मोठ्या खेळाडूंनी घेतलेल्या माघारीमुळे बऱ्याच चांगल्या खेळाडूंच्या खेळापासून चाहते वंचित राहणार आहे. याची झळ अगदी कर्णधारांना पण बसली आहे.५ भारतीय तर ४ ऑस्ट्रेलियन कर्णधार या वेळी वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व करताना दिसतील. पाहूया यावर्षी ८ संघांचे नेतृत्व कुणाकडे आहे ते…
रॉयल चॅलेंन्जर बेंगलोर
या संघाचा पूर्णवेळ कर्णधार भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार विराट कोहलीकडे आहे. विराटने यापूर्वी ७२ सामन्यात बेंगलोरच नेतृत्व केलं असून ३६ सामने जिंकले आहेत. परंतु दुखापतीमुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यात खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत संघाची धुरा ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू कडे अर्थात शेन वॉटसनकडे देण्यात आली आहे. वॉट्सनने यापूर्वी २१ सामन्यात राजस्थानचे नेतृत्व केले आहे व फक्त ७ सामन्यांमध्ये विजय त्याला मिळविता आला आहे.
पुणे सुपर जायंट्स
गेल्या वर्षीच्या खराब कामगिरीमुळे भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून पुण्याचं नेतृत्व ह्या हंगामात काढून घेण्यात आले आहे. आता स्टिव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराकडे ते देण्यात आले आहे. स्मिथने यापूर्वी पुणे आणि राजस्थानचे नेतृत्व केले असून ९ सामन्यात ६ विजय मिळविले आहे.
किंग्स ११ पंजाब
यावर्षी किंग्स ११ पंजाबच नेतृत्व ग्लेन मॅक्सवेल करणार आहे. स्फोटक फलंदाज असलेल्या मॅक्सवेलने यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचं नेतृत्व केलेलं नाही. पंजाबच्या व्यवस्थापनाने या अष्टपैलू खेळाडूवर मोठा विश्वास आणि जबाबदारी टाकली आहे.
केकेआर
गौतम गंभीर, भारतीय संघाचा एकवेळचा पूर्णवेळ सदस्य केकेआरच नेतृत्व करत आहे. गंभीरने यापूर्वी तब्बल १०७ सामन्यात दिल्ली आणि कोलकाताच नेतृत्व केलं आहे. आयपीएलमधील धोनी नंतरच्या एका यशस्वी कर्णधारात त्याची गणना होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली दिल्ली आणि पंजाब संघाने ६१ विजय आणि ४५ पराभव पहिले आहे.
सनरायसर्स हैद्राबाद
या संघाचा कर्णधार आहे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर. दिल्ली आणि हैद्राबादच नेतृत्व करताना वॉर्नरच्या या दोन्ही संघांनी मिळून १८ विजय आणि १५ पराभव पहिले आहेत.
मुंबई इंडियन्स
दोन वेळा भारताकडून एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा रोहित शर्मा यावेळीही मुंबई इंडियन्सच नेतृत्व करत आहे. रोहित मुंबईचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने ५८ सामन्यात मुंबईच नेतृत्व केलं आहे. ज्यात ३४ विजय आणि २४ पराभवांचा समावेश आहे. रोहित गेले ५ महिने क्रिकेट पासून दुखापतीमुळे दूर होता. त्याने देशांतर्गत क्रिकेट सामने खेळले आहे परंतु त्यात त्याला विशेष चमक दाखवता आली नाही.
दिल्ली डेरडेव्हिल्स
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यावेळी दिल्ली डेरडेव्हिल्सच नेतृत्व करत आहे. आयपीएल मधील एखाद्या संघाचं नेतृत्व करणारा झहीर हा एकमेव गोलंदाज आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला आणि आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवित असलेला झहीर हा वॉटसन नंतरचा दुसरा खेळाडू आहे. झहीरने यापूर्वी दिल्लीचे नेतृत्व करताना १२ सामन्यात ६ विजय आणि ६ पराभव पहिले आहे.
गुजरात लायन्स
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये समावेश झालेलया गुजरात संघाचे नेतृत्व पहिल्यापासूनच सुरेश रैनाकडे देण्यात आले आहे. रैनाने यापूर्वी चेन्नई आणि गुजरातचे नेतृत्व करताना १८ सामन्यात १० विजय व ७ पराभव पहिले आहे. तर एक टाय सामन्याचाही त्यात समावेश आहे. सध्या रैना भारतीय संघाच्या बाहेर आहे.