नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने आयपीएलबाबत एक महत्वाचे विधान केले आहे. आयपीएलमुळे प्रेक्षकांच्या वागणूकीत अमुलाग्र बदल झाल्याचे आगरकरने सांगितले आहे. याबाबत त्याने त्याच्या करिअरमधील काही प्रसंगांची आठवण सांगितली.
स्वतःच्याच होम ग्राउंडवर प्रेक्षकांनी हुर्ये उडवली होती, कारण…
अजित आगरकर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. तेव्हा त्याला त्याच्याच होम ग्राउंडवर म्हणजेच मुंबईत प्रेक्षकांच्या अनपेक्षित वागणूकीला सामोरे जावे लागल्याचे त्याने सांगितले. कोलकाताकडून खेळत असताना मुंबईत प्रेक्षकांनी आपली टर उडवली असल्याचे आगरकरने सांगितले.
वानखेडे येथे एकदा मुंबई विरुद्धच्या सामन्यात खेळत असताना, कोलकाताचा संघ अवघ्या ६७ धावांत गारद झाला होता. यानंतर मुंबईने हे आव्हान ५.३ षटकांत पुर्ण केले होते. त्या सामन्यात अजित आगरकरने संघाकडून सर्वोत्तम १५ धावा केल्या होत्या. तसेच एका ओव्हरमध्ये ५ रन दिले होते.
मुंबईच्या बाजूने खेळताना मात्र, प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असायचा…
‘मी कित्येकदा वानखेडेवर क्रिकेटचे सामने खेळलो आहे. जेव्हा मी तिथे मुंबई संघासाठी खेळत होतो. तेव्हा मला प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा असायचा. मात्र, याउलट जेव्हा मी मुंबई संघाविरुद्ध खेळायचो, तेव्हा मात्र प्रेक्षक टर उडवायचे’ असे अजित आगरकर याने म्हटले आहे.
आयपीएलमुळे प्रेक्षकांचा खेळाडूकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला…
‘जेव्हा एखादा खेळाडू फ्रँचायजीसाठी खेळत असतो. तेव्हा प्रेक्षकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलतो. जसे की, आयपीएलमध्ये मी कोलकाता संघाकडून खेळत होतो. मात्र, जेव्हा मी भारतीय संघांचे प्रतिनिधीत्व करत मुंबईत खेळत होतो, तेव्हाही मला माझ्या खराब गोलंदाजीमुळे प्रेक्षकांच्या रागाचा आणि अनपेक्षित टोमण्यांचा सामना करावा लागला. आयपीएलमुळेच प्रेक्षकांमध्ये हा बदल झाला आहे.’ असे अजित आगरकर याने म्हटले आहे.
प्रेक्षक आता खेळाडूला फ्रँचायजीच्या नावाने ओळखतात, हा बदल आयपीएलमुळेच…
प्रेक्षकांच्या वागणूकीबाबत आता आपण विचार करत नसल्याचे आगरकर याने सांगितले आहे. मात्र, त्याने प्रेक्षकांच्या बदललेल्या स्वभावाबाबत बोलताना सांगितले की, ‘आयपीएल हे पुर्णतः वेगळे आहे. येथे सर्व काही फ्रँचायजींच्या नावाने घडत असते. प्रेक्षकांच्या मनात देखील आपल्या प्रादेशिक संघ आणि फ्रँचायजीबाबत वेगळेच प्रेम असते. त्यामुळेच काही फ्रँचायजी आणि खेळाडू आयपीएलमुळे इतके मोठे झाले की, लोक त्यांना त्या संघाच्या नावानेच ओळखतात.’ अशी टिपण्णी अजित आगरकर याने केली आहे.