---Advertisement---

‘विजयाचा जल्लोष, पण मनात खदखद… ‘, श्रेयस अय्यरची नाराजी समोर

On: मंगळवार, मार्च 11, 2025 7:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसाठी गेल्या एक वर्ष चढ-उतारांनी भरलेले आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याला कसोटी संघातून वगळण्यात आले. त्यानंतर अय्यरचा बीसीसीआयचा केंद्रीय करारही काढून घेण्यात आला. मात्र, कठीण काळात अय्यरने स्वतःवर कठोर परिश्रम केले. भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकून देण्यात त्याने आता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 30 वर्षीय श्रेयसने स्पर्धेत पाच सामन्यांमध्ये 48.60 च्या सरासरीने 243 धावा केल्या. तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.  शिवाय कर्णधार रोहित शर्माने अय्यरला ‘सायलेंट हिरो’ म्हटले.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आयपीएल 2024 मध्ये चॅम्पियन बनले, संघाने 10 वर्षांचा ट्रॉफी दुष्काळ संपवला. मात्र केकेआरने विजेतेपद जिंकल्यानंतरही, अय्यर आणि फ्रँचायझी वेगळे झाले. फ्रँचायझीने त्याला कायम ठेवले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अय्यरने उघडपणे आपली वेदना व्यक्त केली आहे. तो म्हणाला की केकेआरला ट्रॉफी जिंकण्यास मदत करूनही त्याला अपेक्षित असलेली ओळख मिळाली नाही. अय्यर आता पंजाब किंग्ज (PBKS) चा भाग आहे. आयपीएल मेगा लिलावात पंजाबने अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे.

श्रेयस अय्यर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, “चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर माझा करार संपला, आणि त्या काळात मला स्वतःबद्दल खूप काही शिकण्याची संधी मिळाली. मी माझ्या चुका ओळखल्या, त्यातून शिकत गेलो. काय सुधारायचंय? फिटनेसकडे किती लक्ष द्यायला हवं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली. मग मी स्वतःसाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या तयार केली आणि माझ्या कौशल्यांना अधिक धार दिली. एकदा का देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमित खेळायला मिळू लागलं, तेव्हा फिटनेसचं महत्त्व जाणवलं. सुरुवातीला काही शंका होत्या, पण त्या दूर करत मी स्वतःवर विश्वास ठेवला. आता मागे वळून पाहताना वाटतं मी त्यातून सहीसलामत बाहेर पडलो, परिस्थितीशी लढलो आणि आत्मविश्वास गमावला नाही. यापेक्षा अधिक काय हवं?”

पण या प्रवासात निराशेच्या छटा उमटल्या का? यावर अय्यर हसत उत्तरला, “निराशा यायला वेळच कुठे मिळाला? मी आयपीएलमध्ये गुंतलो होतो. माझं लक्ष्य स्पष्ट होतं—ट्रॉफी उचलायची, आणि सुदैवाने आम्ही ती जिंकलोही! पण, खरं सांगायचं तर, माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटत राहिलं की, आयपीएल जिंकल्यानंतर मला हवी तशी ओळख मिळाली नाही.”

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर थरारक सामना, या संघाशी भिडणार टीम इंडिया
या कारणामुळं टीम इंडियाची विजयी परेड रद्द, बीसीसीआयकडून अनपेक्षित उत्तर
मुंबई इंडियन्ससाठी अंतिम संधी, RCB बनणार अडथळा?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---