अस्सल अष्टपैलू खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये अभावानेच मिळतात. आतापर्यंत भारताने दर्जेदार वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून केवळ कपिल देव हेच क्रिकेट जगताला दिले आहेत. मधल्या काळात अजित आगरकर व इरफान पठाण यांनी थोडीफार आशा निर्माण केली मात्र ते आपल्या प्रतिभेला योग्य न्याय देऊ शकले नाहीत. सध्या, हार्दिक पांड्या भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावत असला तरी, त्याच्यात सुधारणेला अजून खूप वाव आहे. अष्टपैलू खेळाडूची उपस्थिती संघाला संतुलन प्राप्त करून देते. अष्टपैलू खेळाडू एका विभागात अयशस्वी ठरले तरी दुसर्या विभागात चांगली कामगिरी करू शकतात. अष्टपैलू खेळाडूने, फलंदाजी व गोलंदाजीत एकाच वेळी योगदान दिले तर संघाला विजय मिळवण्यात अडचणी येत नाहीत.
सध्या भारताच्या क्रिकेट वर्तुळात एक वेगवान गोलंदाजी करणारा तसेच खालच्या क्रमांकावर घेऊन ताबडतोब फटकेबाजी करणारा एक खेळाडू चर्चेत आहे. सोबतच तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही आहे. अवघा २३ वर्षाचा असलेला हा विदर्भाचा खेळाडू म्हणजे दर्शन नळकांडे. त्याचे ८ एप्रिलला गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण झाले. पदार्पणातच त्याने सर्वांना प्रभावित करत २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता तो आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसले आहे.
विदर्भातील अकोल्यासारख्या शहरात जन्मलेला दर्शन अत्यंत बुजऱ्या स्वभावाचा होता. तो घरातून सहसा बाहेर पडत नसत. सतत व्हिडिओ गेम खेळण्याचा त्याला छंद होता. घरचे वैतागून, “कमीत कमी गच्चीवर तरी फिरून ये बाबा” अशी विनवणी करत. क्रिकेट आवडत असल्याने त्याने अखेर घरच्यांना सांगून १२ व्या वर्षी नागपूरच्या एका स्थानिक क्रिकेट अकादमी प्रवेश घेतला.
वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या प्रितम गंधे यांची नजर दर्शनवर पडली. त्याच्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित होऊन त्यांनी त्याची निवड विदर्भाच्या १६ वर्षाखालील संघात केली.
दर्शनविषयी सांगताना गंधे म्हणतात, “दर्शनला पाहून मी पहिल्यांदा अवाक् झालो. त्याच्या वयोगटातील मुलांपेक्षा तो खूप वेगवान होता. विरुद्ध संघातील फलंदाज नव्हेतर यष्टीरक्षक देखील त्याचा चेंडू पकडू शकत नव्हता. त्याच्या गोलंदाजीवर हलकासा किनारा लागला तरी चेंडू सीमापार जात.”
दर्शन विदर्भाच्या वयोगट संघांसाठी चांगली कामगिरी करत होता. मात्र, विशेष असं काही त्याने दाखवलं नव्हतं. त्याचे पहिले चांगले प्रदर्शन २०१६-१७ च्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये आले. तेथे त्याने बडोद्याविरुद्ध शानदार शतक ठोकले. दर्शनने फलंदाजीत ४७.१७ च्या सरासरीने तीन अर्धशतक ठोकली. यात १३ षटकारांचा समावेश होता. गोलंदाजीतही ३१ बळी त्याच्या खात्यात जमा झाले होते. दर्शनच्या कामगिरीमुळे विदर्भाने त्यावर्षी कूच बिहार ट्रॉफी पहिल्यांदाच आपल्या नावे केली. त्याच मोसमात त्याने २३ वर्षाखालील संघातही चांगली कामगिरी केली. त्याच्या ४८ चेंडूतील ६७ धावांच्या खेळीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बडोद्याविरुद्ध विदर्भाला विजय मिळाला. दर्शनच्या गोलंदाजी बद्दल ऐकून भारतीय युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आधी भारताच्या १९ वर्षाखालील संघाला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. दर्शनच्या कामगिरीने प्रभावित झालेल्या द्रविड यांनी त्याची निवड युवा आशिया चषकासाठी भारतीय संघात केली.
विदर्भाच्या वरिष्ठ संघात पदार्पण देखील त्याने धडाक्यात केले. २०१८-१९ च्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये महाराष्ट्राविरुद्ध विदर्भ पराभवाच्या छायेत असताना ३० चेंडूत पाच उत्तुंग षटकार व एका चौकारा च्या सहाय्याने ५३ धावा फटकावत विदर्भ संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
२०१९ साठी झालेल्या आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्यावर तीस लाखाची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्यावर्षी आयपीएल खेळणारा उमेश यादव नंतर तो विदर्भाचा फक्त दुसरा खेळाडू होता. पंजाब संघाचे अधिकारी प्रसन्ना अगोराम, दर्शनच्या निवडीविषयी सांगतात,
“दर्शन सारखा खेळाडू आम्हाला मूळ किमतीत मिळाला ही आनंददायी गोष्ट आहे. त्याची बोली एक करोड पर्यंत जरी गेली असती तरी आम्ही त्याला संघात निवडले असते. जेव्हा मी त्याच्या खेळाचा व्हिडिओ पाहिला तेव्हा समजले हा संघासाठी उपयोगी ठरू शकतो. आम्ही त्याला चाचणीसाठी बोलावले आणि चाचणी वेळी आम्हाला कळाले हा किती अमूल्य आहे. त्याची गोलंदाजी वेगवान वाटत नसली तरी खेळताना फलंदाजाच माहिती काय होते ते.”
२०१९ आयपीएल मध्ये दर्शनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तरीही पंजाब संघाने त्याला २०२० वर्षीच्या आयपीएल हंगामासाठी संघात कायम ठेवले. मात्र, या हंगामातही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर गुजरात टायटन्सने २०२२ साठी त्याला संघात स्थान दिले आणि आयपीएल पदार्पणाची संधीही दिली. आता पुढे दर्शनला किती संधी मिळते आणि तो याचा कसा उपयोग करतो हे पाहाण्यासारखे असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सरकारने घेतले दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ताब्यात, नक्की काय आहे प्रकरण
शाहरुखचा त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघ बनला चौथ्यांदा सीपीएल चॅम्पियन; जाणून घ्या आत्तापर्यंतचे विजेते
एमएस धोनीच्या गावचा पोरगा, जो यंदा करु शकतो चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण?