आयपीएलच्या १३व्या मोसमाचे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. १९सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० या काळात ही स्पर्धा दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळण्यात येणार आहे. यूएईमध्ये यापूर्वी २०१४ साली आयपीएलच्या अर्ध्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु युएईमध्ये फार कमी संघांना चांगली कामगिरी करता आलेली आहे. यामध्ये एक संघ असाही आहे, ज्याला एकही सामना जिंकता आलेला नाही.
चला तर मग जाणून घेऊया युएईमध्ये आयोजित केलेल्या आयपीएलमध्ये कोणत्या संघाने किती सामने जिंकले आहेत…
यापूर्वी २०१४ साली यूएईमध्ये आयपीएलच्या एकूण सामन्यांपैकी केवळ ४० टक्के सामन्यांचे म्हणजेच सुरुवातीच्या २० सामन्यांचे आयोजन केले होते. कारण २०१४ साली भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी सुरक्षितता लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या काही सामन्यांचे आयोजन युएईमध्ये केले होते. आयपीएलच्या सध्याच्या सर्व म्हणजेच ८ संघांनी दुबई, शारजाह आणि आबू धाबी मध्ये प्रत्येकी ५ सामने खेळले.
यूएईमध्ये पाचच्या ५ सामने जिंकण्याचा मान किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या नावावर केला. दुसऱ्या क्रमांकावर ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज आहे. सीएसकेने युएईत ४ सामने जिंकले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ आहे, त्यांनी ३ सामने जिंकले.
यानंतर कोलकाता नाईट रायडर्स चौथ्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पाचव्या, सनरायझर्स हैद्राबाद सहाव्या आणि दिल्ली डेअरडेविल्स संघ सातव्या क्रमांकावर आहे. या संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहे. याव्यतिरिक्त आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ मुंबई इंडियन्सला मात्र युएईमध्ये एकही सामना जिंकता आला नाही. त्यांना २०१४ ला युएईत झालेल्या त्यांच्या सर्व ५ सामन्यांत पराभव स्विकारावा लागला होता.