सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा आयपीएलचा सीझन मार्चपासून सुरू झालाय. आयपीएल सुरू झाल्यावर क्रिकेट व्यतिरिक्त एका व्यक्तीची चर्चा नेहमी होत असते. ही व्यक्ती म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान. एकतर शाहरुख जबरा क्रिकेट फॅन. त्यातून कोलकाता नाईट रायडर्सचा संघमालक, त्यातून त्याचे स्टारडम. या सर्व गोष्टी असताना आयपीएल वेळी त्याची चर्चा होते ती वेगळ्याच कारणाने. हे कारण म्हणजे त्याने वानखेडे स्टेडियमवर साध्या मराठी गार्डसोबत घातलेली हुज्जत. आज दशक उलटून गेले असले तरी हा वाद तितकाच रंगवून सांगितला जातो.
दिवस होता १६ मे २०१२ चा. गंभीरच्या कॅप्टन्सीत शाहरुखची केकेआर त्यावर्षी तुफान फॉर्मात होती. सीझनची ६५ वी मॅच होती मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदा बॅटिंग करत केकेआरने फक्त १४० धावा केल्या. पण नारायणने त्या दिवशी मुंबईच्या बॅटर्सला असे काय नाचवले की, दुनिया हिला देंगे म्हणणारी मुंबई १०८ धावांमध्ये सर्वबाद झाली. इथपर्यंत घडलं ते फक्त सामन्यापुरत मर्यादित राहिलं आणि लोक विसरून गेले. पण त्यानंतर जे घडलं ते आयपीएलच्या इतिहासात काळ पान म्हणून लिहिल गेल.
मॅच मुंबईमध्ये होती. त्यामुळे शाहरुखचा परिवार आणि मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात मॅच पाहायला वानखेडे स्टेडियमवर पोहोचलेली. सोने पे सुहागा म्हणजे केकेआर मॅच जिंकली. आता सेलिब्रेशन करण्यासाठी आणि टीमला भेटण्यासाठी शाहरुख आणि त्याची सारी पलटण स्टँडमधून ग्राउंडवर जाण्यासाठी निघाली.
शाहरुख आपली मुलं आर्यन, सुहाना आणि मित्रांसोबत ग्राउंडमध्ये जात असतानाच विकास दळवी नावाच्या गार्डने त्यांना हटकले. इथेच दळवी आणि शाहरुख यांच्यात बाचाबाची झाली. शाहरुखने आपल्या स्टारडमचा जोर वगैरे दाखवला असेल, तरीही मोडेल पण वाकणार नाही, असा करारी बाणा दाखवत दळवी यांनी त्याला आतमध्ये सोडले नाही. इतक्यात तिथे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी पोहोचले. शाहरुखने त्यांच्याशीही हुज्जत घातली. प्रकरण चांगलेच तापतेय असे दिसल्यावर त्यावेळी मुंबईचे एसएसपी असलेल्या इक्बाल शेख यांनी शाहरूखला स्टेडियम बाहेर नेले.
हा सर्व प्रकार ऑफ कॅमेरा घडला होता. त्यामुळे टीव्हीवर मॅच पाहणाऱ्यांना काय घडले हे माहीत नव्हते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या न्यूजपेपरमध्ये शाहरुख गार्डशी वाद घालत असल्याचे फोटो फ्रंटपेजवर छापून आले. सगळ्या न्यूज चॅनलने दिवसभर बातमी चालवून-चालवून तिचा कीस पाडला आणि प्रकरणाने जोर धरला.
त्यावेळी समोर आलेल्या रिपोर्सनुसार चौकशी समिती बनविण्यात आली. शाहरुखने स्पष्टीकरण देत म्हटले, ते माझ्या मुलांवर ओरडल्याने माझा संयम सुटला आणि मी त्यांच्याशी हुज्जत घातली. पण त्यांनी मुलांशी नीट वागायला हवे होते. तिकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले, शाहरुख पूर्णपणे नशेत होता आणि त्याने आम्हाला ही शिवीगाळ केली. शाहरुखच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर देखील नोंदवली गेली. तत्कालीन एमसीए अध्यक्ष विलासरावजी देशमुख यांनी तातडीची बैठक घेतली आणि शाहरुखवर पाच वर्ष वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी घातली गेली. थोडी आणखी चौकशी झाली आणि त्यात शाहरुखने मद्यपान केले नसल्याचे समोर आले. शाहरुखवरील पाच वर्षाची बंदी दोन वर्ष आधीच म्हणजे २०१५ ला उठवली गेली.
तसेच माध्यमांतील वृत्तानुसार हे सर्व प्रकरण त्यांच्यामुळे सुरू झाले त्या विकास दळवी यांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दळवी यांनी शाहरुखला करारी बाणा दाखवल्याने मनसेने त्यांचा सत्कार केला, अशी बातमी आली. दळवी काही दिवस लाइमलाइटमध्ये राहिले, पण त्यांना होणारा त्रास तेच जाणून होते. मिडीयाने त्यांचा पिच्छा पुरवला. मीडिया त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. दळवी सततच्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्या आणि मीडिया बाईटमूळे पुरते वैतागले. काही दिवस मुंबई सोडून त्यांनी आपल्या मूळ गावी मुक्काम हलवला. मात्र जसे हे प्रकरण मिटले तसे दळवी यांनादेखील कोणी विचारले नाही.
आज शाहरुख बिंदास वानखेडेमध्ये जाऊ शकतो. थेट किंग खानशी पंगा घेणारे विकास दळवी सध्या काय करतात हे माहीत नाही. शाहरुखने काही वर्षानंतर रजत शर्मांच्या आपकी अदालतमध्ये या प्रकरणाची माफी देखील मागितली. जेव्हा-केव्हा आयपीएलचा इतिहास लिहिला जाईल, त्यात शाहरुख खान नावाचा पूर्ण चॅप्टर असेल. पण त्या चॅप्टरमधील एक पॅराग्राफ नक्कीच विकास दळवी या नावाचा असेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
ड्रीम ११मध्ये पैसे लावून तुम्ही खरंच करोडपती होता येतं का? वाचा नक्की काय आहे हे गणित






