आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 22 वा सामना गुरुवारी (8 ऑक्टोबर) दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल.
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हैदराबाद संघाचे संतुलन बिघडले आहे. या हंगामात हैदराबादने आतापर्यंत 2 सामने जिंकले आहेत. मात्र या लीगमध्ये पंजाबची स्थितीही चांगली नाही. 5 पैकी 4 सामने गमावल्यानंतर पंजाब गुणतालिकेत तळाशी आहे.
या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 5 सामन्यात हैदराबादने 3 आणि पंजाबने 2 सामने जिंकले आहेत. मागील हंगामात झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला होता.
डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांचावर असेल फलंदाजीची जबाबदारी
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सलामीवीर जॉनी बेयरस्टो यांच्यावर डावाची चांगली सुरुवात करण्याची जबाबदारी असेल. स्टार फलंदाज मनीष पांडे याला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आली नाही. तरूण खेळाडूंवर दबाव कमी करण्यासाठी या तिन्ही फलंदाजांना धावा कराव्या लागतील.
रशिद खानवर असेल अधिक जबाबदारी
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू मिशेल मार्श जखमी झाल्यामुळे गोलंदाजीची जबाबदारी फिरकीपटू राशिद खानवर असेल. मुंबईविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात राशिदने 4 षटकांत 22 धावा देऊन एक गडी बाद केला होता. संघाला या सामन्यात त्याच्याकडून बर्याच अपेक्षा आहेत.
राहुल आणि मयंक व्यतिरिक्त पंजाबचे उर्वरित फलंदाज झाले फ्लॉप
पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या 3 फलंदाजांमध्ये आहेत. परंतु अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान यांच्यासह मधल्या फळीतील फलंदाज खराब फॉर्ममध्ये आहे.
डेथ ओव्हरमध्ये पंजाबची गोलंदाजी आहे कमकुवत
पंजाबचे गोलंदाज सुरुवातीच्या षटकांत शानदार गोलंदाजी करत आहेत, परंतु शेवटच्या षटकांत गोलंदाजांनी बऱ्याच धावा दिल्या आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 5 सामन्यात 8 बळी घेतले आहेत. वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने 5 सामन्यात 5 बळी घेतले आहेत. युवा फिरकीपटूं रवी बिश्नोईने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. पण तरीही पंजाबला शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करण्याचे आव्हान असेल.
पंजाब-हैदराबादमधील महागडे खेळाडू
हैदराबादचा सर्वात महागडा खेळाडू डेविड वॉर्नर आहे. एका हंगामातील त्याची किंमत 12.50 कोटी रुपये आहे. त्यानंतर मनीष पांडे (11 कोटी) याचा क्रमांक येतो. कर्णधार केएल राहुल (11 कोटी) पंजाबमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी) याचा क्रमांक लागतो.
खेळपट्टी आणि हवामानाबद्दल माहिती
दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. तापमान 24 ते 39 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असेल. खेळपट्टी संथ असल्याने फिरकीपटूंना खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. दुबईमध्ये यापूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळविण्याचा दर 55.74 % आहे.
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावातील सरासरी धावसंख्या: 122
हैदराबादने 2 वेळा जिंकला आयपीएलचा किताब
हैदराबादने दोन वेळा (2018, 2016) अंतिम फेरी गाठली आहे आणि 2016 ला विजय मिळवला आहे. त्याचबरोबर पंजाबने अद्यापही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही. 2014 मध्ये पंजाबने एकदाच अंतिम फेरी गाठली होती.
हैदराबाद आणि पंजाबचा विजय मिळवण्याचा दर :
आयपीएलमध्ये हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर 53.09% आहे. हैदराबादने आतापर्यंत 113 सामने खेळले आहेत, त्यापैकी 60 सामने जिंकले आहेत आणि 53 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पंजाबचा विजय मिळवण्याचा दर 45.58% आहे. पंजाबने आतापर्यंत 181 सामने खेळले असून त्यापैकी 83 सामने जिंकले आहेत आणि 98 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.