भारतीय संघाने आयर्लंडच्या दौऱ्याची विजयी सुरूवात केली आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २६ जूनला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात आयर्लंडवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. द विलेज, मालाहिदे, डबलिन येथे खेळला गेलेला हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी १२-१२ षटके टाकली. यावेळी भारतीय संघाचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.
भुवनेश्वरने या सामन्यात ३ षटके टाकताना १६ धावा देत १ विकेट घेतली आहे. ही एक विकेट घेताच तो आंतरराष्ट्रीय टी२०च्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्रीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टी२०च्या पॉवरप्लेमध्ये भुवनेश्वरने ३४ तर बद्रीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
३४ – भुवनेश्वर कुमार*
३३ – सॅम्युअल बद्री
३३ – टीम साउदी
२७ – शाकिब अल हसन
२६ – जोश हेझलवूड
या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भुवनेश्वरने सामन्याच्या पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर आयर्लंडचा कर्णधार अँड्रयू बालबर्नीला शून्यावर त्रिफळाचीत केले. पंड्या, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आयर्लंडला १२ षटकात १०८ धावांवर रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचे सलामीवर दीपक हुड्डा आणि इशान किशन यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. हुड्डाने २९ चेंडूत नाबाद ४७ धावा, तर इशानने ११ चेंडूत २६ धावा केल्या आहेत.
भारतीय संघात परतलेला सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नंतर आलेल्या पंड्याने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्याजवळ नेले. त्याने १२ चेंडूत २४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर दिनेश कार्तिकने एक चौकार मारत नाबाद ५ धावा केल्या.
या सामन्यातून उमरान मलिक (Umran Malik) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या या महत्वाच्या सामन्यात एकच षटक टाकले आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी२० सामना २८ जूनला डबलिन येथेच खेळला जाणार आहे. या सामन्याच्या दिवशीही तेथिल हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात नवा खेळाडू दाखल, घेऊ शकतो रोहितची जागा
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा
बंदे में है दम! इशानने फक्त १६ टी२०त गाठला मैलाचा दगड; विराटशी बरोबरी, तर युवराजला पछाडले