आयर्लंड क्रिकेटसाठी आजचा (शनिवार,१४ फेब्रुवारी) दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्यांनी हंगामातील सर्वोच्च धावसंख्या, इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक क्षणामध्ये कर्णधार लॉर्कन टकरने मोठी भुमिका पार पाडली आणि नावावर अनेक विक्रम केले आहेत.
आयर्लंडचा नियमीत कर्णधार पॉल स्टर्लिंग दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी टकरने घेतली. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या ओमानविरुद्धच्या सामन्यात त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत १८४.३१च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने ५१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या साहाय्याने नाबाद ९४ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने वेस्ट इंडिजचा माजी स्फोटक फलंदाज क्रिस गेलच्या मोठ्या विक्रमाला धक्का दिला. तसेच भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.
पुरूष टी२० विश्वचषकाच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या करण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने २०१०मध्ये भारताविरुद्ध ९८ धावा केल्या होत्या. आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टकर आला आहे. तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने २०२४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानावर पुन्हा गेल असून त्याने २००९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या. पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियमसन आहे. त्याने २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर आयर्लंडकडून टी२० विश्वचषकात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रमही टकरच्याच नावावर झाला आहे. तसे हा विक्रम आधीही त्याच्याच नावावर होता. त्याने २०२२च्या टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ धावा केल्या होत्या.
या सामन्यात आयर्लंडने २० षटकात ६ विकेट्स गमावत २३५ धावसंख्या उभारली.






