क्रिकेट विश्वाचा ‘किंग’ मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीवर (Virat Kohli) काही टीकाकार अनेकदा ‘घमंडी’ असल्याचा आरोप करतात. यावरून अनेकदा चर्चाही रंगल्या आहेत. आता विराटचा मित्र आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील बहुतेक सामने विराटसोबत खेळले आहेत, त्यामुळे त्याचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘क्रिकबझ’शी संवाद साधताना अजिंक्य रहाणेला विराट कोहलीच्या स्वभावाविषयी विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, (Ajinkya Rahane on virat kohli) विराट कोहलीबद्दल आपण कितीही बोललो तरी ते कमीच पडेल. जेव्हा तो फलंदाजीला जातो, तेव्हा मी त्याला खूप जवळून पाहिले आहे. आपण त्याच्या पॅशनबद्दल खेळाप्रती असलेली ओढ याबद्दल बोलतो, पण माझ्या मते त्याची वृत्ती, सतत नवीन शिकण्याची जिद्द आणि कधीही हार न मानण्याचा त्याचा बाणा त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतो.
लोकांच्या आरोपांना उत्तर देताना रहाणे पुढे म्हणाला, लोक बाहेरून त्याला ‘घमंडी’ समजतात, पण तो तसा अजिंक्य मुळीच नाही. तो फक्त आपल्या खेळात पूर्णपणे हरवून जातो त्यामुळे तो तसा वाटू शकतो.





