भारत आणि श्रीलंका (IND vs SL t20 series) यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना गुरुवारी (२४ फेब्रुवारी) लखनऊमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने ६२ धावांनी मोठा विजय मिळवला. पहिल्या सामन्यातील विजयासाठी संपूर्ण भारतीय संघाचे योगदान महत्वाचे राहिले. परंतु, यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याच्या योगदानाचा विशेष उल्लेख करावा लागेल. पहिल्या सामन्यात ईशान सामनावीर ठरला, सोबतच दिग्गजांच्या यादीतही त्याने सहभाग नोंदवला आहे.
ईशान किशन या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता. त्याने एकूण ५६ चेंडूंचा सामना केला आणि ८९ धावा केल्या. यामध्ये त्याच्या १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. रोहितसोबत त्याने १११ धावांची भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन गेला. या खेळीच्या जोरावर ईशान त्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यांनी वयाच्या २४ वर्षाच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी केली आहे.
वयाची २४ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी सर्वात मोठी टी-२० खेळी करणाऱ्या यष्टीरक्षक फलांदाजांमध्ये ईशान किशन पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात ८९ धावा केल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सामन्यात ८७ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांवार देखील गुरबाजचेच नाव पुन्हा एकदा आहे. त्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० सामन्यात ७९ धावा केल्या होत्या.
या यादीत चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा टॉम बॅंटन आहे, ज्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० सामन्यात ७३ धावा केल्या होत्या. यादीत पाचव्या क्रमांकावर जोस बटलर आहे, ज्याने इंग्लंसाठी वेस्ट इंडीजविरुद्ध ६७ धावा केल्या होत्या.
त्याव्यतिरिक्त ईशान किशन भारतासाठी टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्येही सहभागी झाला आहे. केएल राहुल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३ वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आणि रिषभ पंत संयुक्तरित्या आहेत. धोनी आणि पंतने प्रत्येकी २ वेळा भारताकडून खेळताना टी२०मध्ये ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ईशान किशन आता या यादीत नव्याने सहभागी झाला आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याने भारतासाठी टी-२० मध्ये ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे.
दरम्यान, पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा आणि तिसरा सामना धरमशालामध्ये २६ आणि २७ फेब्रुवारीला खेळला जाईल. त्यानंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
पहिले षटक आणि भुवीची विकेट! निसंकाला गोल्डन डकवर बाद करताच भुवनेश्वरची अनोख्या विक्रमाला गवसणी