सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेदरम्यान आयसीसीने बुधवारी (१८ फेब्रुवारी) टी२०ची क्रमवारी जाहीर केली आहे. यामधील फलंदाजांच्या क्रमवारीत अनेक बदल दिसले आहे. भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम आहे. फॉर्ममध्ये नसल्याचा त्याच्या क्रमवारीत काही परिणाम झालेला दिसला नाही. दुसरीकडे भन्नाट फॉर्ममध्ये असलेला ईशान किशनने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
पाकिस्तानविरुद्ध ७७ धावांची (४० चेंडू) खेळी केल्याचा ईशानला फायदा झाल्याचे दिसते. त्याने क्रमवारीत १७ स्थानांची झेप घेत थेट ८वे स्थान गाठले आहे. या सामन्यात त्याने प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला होता. या टी२० विश्वचषकात संघपुनरागमन करणारा ईशानचा संघसहकारी तिलक वर्मा यालाही क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने एक स्थानाची उडी घेत चौथे स्थान गाठले आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावर कायम आहे. यावरून टी२० फलंदाजी क्रमवारीत चार भारतीय पहिल्या दहामध्ये आहे. गोलंदाजीत भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती पहिल्या स्थानी कायम आहे. भारताचा उपकर्णधार अक्षर पटेलला ४ स्थानांचा फायदा झाला आहे. तो सध्या १४व्या स्थानावर आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही ६ स्थानांचा फायदा झाला असून त्याने १५वे स्थान गाठले आहे.
हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तसेच भारत टी२० क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. यावरून गतविजेता भारतीय सर्वोत्तम संघ असल्याचे दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा श्रीलंकेचा पथुम निसांकालाही तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा फिल सॉल्ट कायम आहे. पाकिस्तानच्या फलंदाजाला मात्र नुकसान झाले आहे. साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला आहे.
अष्टपैलूच्या क्रमवारीत तगडी स्पर्धा दिसली. पाकिस्तानचा सईम आयुब पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याला झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रझा चांगलीच तोड देत आहे. तो दुसऱ्या स्थानावर आहे. आयुबचे रेटिंग पॉइंट ३०३ असून रझाचे रेटिंग पॉइंट २९७ आहे.





