मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१(आयपीएल) हंगामातील ५१ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ८ गड्यांनी मोठा विजय मिळवला. मुंबईचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन हा या सामन्यातून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला. त्याने झंझावाती नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने षटकार मारत संघाला विजय मिळवून देताना, एका खास यादीत नाव नोंदवले.
अशी कामगिरी करणारा सातवा फलंदाज
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन याची बॅट चांगलीच तळपली. त्याने अवघ्या २५ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व तीन उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या. मुस्तफिजुर रहमानच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने मुंबईला विजयी केले.
आयपीएल २०२१ मध्ये षटकार ठोकत संघाला विजयी करून देणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला. त्याच्या पूर्वी, या हंगामात सहा फलंदाजांनी षटकार मारत संघाला विजयी केले होते. राजस्थानचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस, दिल्लीचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर व रविचंद्रन अश्विन, मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्या, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी व पंजाब किंग्सचा शाहरुख खान यांनी ही कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचा मोठा विजय
प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी अतिशय धारदार गोलंदाजी करत राजस्थानच्या फलंदाजांना नामोहरम केले. वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल याने चार, हंगामातील आपला पहिला सामना खेळणाऱ्या अष्टपैलू जिमी निशाम याने तीन व जसप्रीत बुमराह याने दोन बळी मिळवून राजस्थानचा डाव अवघ्या ९० धावांवर रोखला.
राजस्थानने ठेवलेल्या ९१ धावांच्या आव्हानासमोर कर्णधार रोहित शर्माने १३ चेंडूत वेगवान २२ धावा करून संघाला शानदार सुरुवात दिली. दुसरा सलामीवीर ईशान किशनने २५ चेंडूत तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी करून संघाला ७० चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला. चार बळी घेणाऱ्या कुल्टर नाईल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मुंबई आता आपला अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळेल.